आमचं विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ ! नामविस्तारामुळे शॉर्टफॉर्मचा धोका !!
schedule05 Mar 25 person by visibility 2364 categoryशैक्षणिक

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : शिवाजी विद्यापीठाची स्थापना होऊन सहा दशके झाली. या कालावधीत या विद्यापीठाने ‘लोकल टू ग्लोबल’अशी ओळख निर्माण केली. शिवछत्रपतींच्या नावांनी उभारलेलं हे महाराष्ट्रातील पहिलं आणि एकमेव विद्यापीठ. यामुळे हे विद्यापीठ साऱ्यांच्या आत्मियतेचा, जिव्हाळयाचा आणि अभिमानाचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा लाभावी, शिवरायांच्या कर्तृत्वाचा आदर्श सदैव डोळयासमोर राहावा आणि शून्यातून विश्व साकारण्याची स्वप्नं फुलावी यासाठी हे विद्यापीठ साकारले. अतिशय उदात्त आणि व्यापक उद्देशाने या विश्वविद्यालयाचे नाव ’शिवाजी विद्यापीठ’असे ठेवले. गेल्या ६३ वर्षाच्या कालावधीत विविध कुलगुरुंनी, प्रशासनाने, प्राध्यापकांनी, संशोधकांनी आणि विद्यार्थ्यांनी दिमाखदार शैक्षणिक कामगिरी करत शिवाजी विद्यापीठ या नावाचा लौकिक उंचावला. यामुळे हे विद्यापीठ केवळ एका कॅम्पसपुरता मर्यादित राहिलं नाही. ते इथल्या मातीची ओळख बनली आहे. दक्षिण महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण व संशोधनाचा केंद्र ठरलं आहे. या भागातील प्रत्येकाला हे आपलं विद्यापीठ वाटते. ‘आमचं विद्यापीठ….शिवाजी विद्यापीठ’ ! हे समीकरण दृढ झाले आहे.
सध्या या विद्यापीठाच्या नामविस्ताराची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि आमदार अशोक माने यांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे यासंबंधी निवेदन दिले आहे. ‘शिवाजी विद्यापीठ’ या नावामुळे महाराजांचा एकेरी उल्लेख होतो असेही सांगितले जाते. मात्र शिवाजी विद्यापीठ या नावांत आत्मियता, आंतरिक ओढ असल्याचे सांगितले जाते. विद्यापीठाच्या स्थापनेवेळी सुद्धा यासंबंधी सर्वंकष चर्चा झाली होती. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, तत्कालिन मंत्री बाळासाहेब देसाई, पहिले कुलगुरू आप्पासाहेब पवार यांनी उदात्त विचारांनी, अतिशय योजकतेने ‘शिवाजी विद्यापीठ’हेच नाव निश्चित केले. जेणेकरुन शिवाजी विद्यापीठ हे नाव हृदयात कोरेल, विद्यार्थ्यांच्या ओठावर रुळेल. शिवछत्रपतींच्या पराक्रमाची सदैव स्मरण होत राहील आणि आपणही आपआपल्या क्षेत्रात ‘शिवाजी’ होऊ असा दुर्दम्य आशावाद निर्माण होईल आणि शिवरायांची प्रतिमा सदैव लोकांच्या नजेरसमेर राहील हा त्यामागील प्रमुख उद्देश होता.
१८ नोव्हेंबर १९६२ रोजी विद्यापीठाची स्थापना झाली. विद्यापीठाच्या स्थापनेपूर्वीचे नावावरुन काही जणांनी वेगळे मत मांडले होते. दरम्यान राजकारण, समाजकारण, शैक्षणिक क्षेत्रातील धुरिणांनी अतिशय दूरदृष्टीपणाने विद्यापीठाचे नामकरण ‘शिवाजी विद्यापीठ’असे केले आहे. माजी कुलगुरू बॅरिस्टर पी. जी. पाटील यांनी ‘शिवाजी विद्यापीठ’हेच नाव का याची तपशीलवार मांडणी अनेकदा केली आहे. याचे दाखले आहेत. हा सारा इतिहास लोकांना माहित आहे.
विद्यापीठाचे नाव ‘शिवाजी विद्यापीठ’हेच सार्थ ठरते. त्याचा नामविस्तार न करता ‘शिवाजी विद्यापीठ’हेच नाव कायम राहील अशा भावना नागरिकांच्या आहेत. सध्याच्या मोबाइल, एसएमएसच्या दुनियेत ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’चे ‘सीएसएमयु’व्हायला वेळ लागणार नाही. नामविस्ताराचा मुद्दा प्रतिष्ठेचा करुन तो यशस्वी केला तर ‘शिवाजी विद्यापीठ’हे नावही लोकांच्या नजरेआड होईल. अशिक्षित असो की सुशिक्षित अगदी सहजपणे आपलं ‘शिवाजी विद्यापीठ’ज्या अभिमानाने म्हणतो, चारचौघांत मिरवतो ते सारं आपण नामविस्ताराच्या नावाखाली गमावण्याचा धोका आहे.