जिपतील बदल्या…प्रशासनाकडून चित्रीकरणाद्वारे सुलभ प्रक्रिया ! बदल्यामध्ये अनियमितता झाल्याची लिपीक संघटनेची तक्रार !
schedule23 May 25 person by visibility 266 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेने गुरुवारी (२२ मे २०२५) ८२ जणांच्या बदल्या केल्या. बदली प्रक्रियेत कोणत्याही प्रकारच्या शंकेला जागा नको म्हणून व्हिडीओ चित्रीकरण केले जात आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस व सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा देसाई यांच्या उपस्थितीमध्ये बदली प्रक्रिया राबविण्यात आली. प्रशासनाने बदली प्रक्रिया सुलभ पद्धतीने पार पाडण्याच्या पद्धतीने कार्यवाही केली. दरम्यान जिल्हा परिषद कर्मचारी लिपीक वर्गीय संघटनेने, . सर्वसाधारण बदल्यामध्ये अनियमितता झाल्याची तक्रार विभागीय आयुक्तांकडे केली आहे.
जिल्हा परिषद प्रशासनातर्फे गुरुवारी राबविलेल्या बदली प्रक्रियेत प्रशासकीय, विनंती व आपसी बदल्या केल्या आहेत. यामध्ये सामान्य प्रशासनाकडील ५३, एकात्मिक बाल सेवा योजनेतील ११, पशुसंवर्धन विभागातील आठ व प्राथमिक शिक्षण विभागातील दहा बदल्या केल्या आहेत. शनिवारी, २४ मे रोजी आरोग्य, बांधकाम व वित्त विभागातील बदल्या होणार आहेत. ग्रामपंचायत विभागातील बदल्या २९ तारखेला आहेत.
दरम्यान महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी लिपीक वर्गीय कर्मचारी संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष निलेश म्हाळुंगेकर, सचिव फिरोजखान फरास यांनी बदली प्रक्रियेतींल काही त्रुटीवर प्रकाशझोत टाकून त्यासंबंधी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे दाद मागितली आहे. विभागीय आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे, ‘जिल्हा परिषदेच्या वर्ग तीनमधील कर्मचाऱ्यांच्या सर्वसाधारण बदल्या ग्रामविकास विभागाकडील सरकारी निर्णय १५ मे २०१४ मधील तरतुदीनुसार होतात. तथापि कोल्हापूर जिल्हा परिषदेकडील २०२५ मधील जिल्हा स्तरावरील बदल्या या सरकारी तरतुदीनुसार पार पडल्या नाहीत. यामध्ये अनियमितता दिसून येत आहे. जिल्हा स्तरावरील बदल्यांचा कालावधी हा पाच मे ते पंधरा मे असा निश्चित केला आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेने २२ मे ते २४ मे २०२५ या कालावधीत बदल्यांचा कार्यक्रम राबविला आहे.
जिल्हा स्तरावरुन बदल्या करताना बदलीसाठी उपब्लध असणाऱ्या रिक्त पदांची व प्रशासकीय बदलीने उपलब्ध होणाऱ्या रिक्त् पदांची पूर्ण व अचूक माहिती समुपदेशनाच्या किमान दोन दोन दिवस अगोदर सूचना फलकावर व संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी लागते. तथापि कोल्हापूर जिल्हा परिषदेने ही रिक्त पदांची भरती दोन दिवस अगोदर प्रसिद्ध केली नाही. बदली दिवशी यादी प्रसिद्ध करताना ती वॉटसअपग्रुपवर एक तास अगोदर मोघम स्वरुपात प्रसिद्ध केली आहे. मुख्यालयातील पदे विभागावर दर्शविली नाहीत. ती मुख्यालय म्हणून एकत्रित दाखविलेली आहेत. सर्वसाधारण बदल्यामुळे अनियमितता झाल्याचे स्पष्ट होत आहे. सरकरी निर्णयातील तरतुदीनुसार रिक्त् पदे दर्शवून पुन्हा समुपदेशन घेण्याविषयी सूचना कराव्यात’असे पत्रात म्हटले आहे.