कृष्णराज महाडिक उगवता सूर्य, आज ना उद्या नक्की दिवस उगवणार ! अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं !!
schedule17 Oct 24 person by visibility 849 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘‘कृष्णराज महाडिक हा राजकारणातील उगवता सूर्य आहे. त्याचे भविष्य उज्ज्वल आहे. संधी कधी मिळेल हे ठावूक नाही. आज ना उद्या…निश्चित माहित नाही पण एक दिवस नक्की उगवेल.अपेक्षा न करता, आपण काम करत करायचं. लोकांसाठी लढायचं. चांगलं राहायचं. आशीर्वाद द्यायला खूप हात आहेत. कोल्हापूर खूप मोठं आहे. काही कमी पडणार नाही. मात्र या वाटचालीत एकटं पुढं जाऊ नका. सगळयांना बरोबर घ्या. सगळयांचा आदर करा...”हे बोल आहेत, खासदार धनंजय महाडिक यांचे !
निमित्त होतं, यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांच्या आतापर्यंतच्या वाटचालीवर आधारित माहितीपटाच्या ट्रेलरचे अनावरण. कृष्णराज महाडिक - द रायझिंग स्टार या नावांनी हा माहितीपट तयार केला आहे. येथील अयोध्या हॉटेल येथे गुरुवारी सायंकाळी दिमाखदार कार्यक्रमात त्याचे अनावरण झाले. या माहितीपटाच्या विविध भागातून यूथ आयकॉनची वाटचाल समोर येणार आहे. यानिमित्ताने आयोजित समारंभाला समाजातील विविध घटकातील मान्यवरांची उपस्थित होती. महाडिक कुटुंबीय, समर्थक व मान्यरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा रंगला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृष्णराज महाडिक यांनी आयोजित या कार्यक्रमाकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. तुडुंब भरलेल्या सभागृहात डाक्युमेंटरीच्या ट्रेलरचे अनावरण झाल्यानंतर खासदार महाडिक व्यासपीठावर आले.
‘कृष्णराज महाडिक यांच्यावरील डाक्युमेंटरी पाहिल्यानंतर आपण भारावून गेलो. पुत्र व्हावा ऐसा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा’अशी माझी भावना बनली आहे. एक वडील म्हणून मला हे सारं अदभूत आहे. मी ज्या ठिकाणी जातो, तिथं लोक मला भेटतात. मुंबई असो, पुणे असो, सोलापूर असो. परवा मी पक्षाच्या कार्यक्रमानिमित्त नागपूरला गेलो होता. कार्यक्रम संपला आणि लोकांनी माझ्याभोवती गर्दी केली. कृष्णराजचे डॅडी अशी माझी ओळख बनली आहे. कृष्णराजच्या फॉलोअर्सची संख्या मोठी आहे. त्यांनी आमच्या कुटुंबीयावर बनविलेले व्हिडिओ पाहून अनेकजण मला भेटतात. तुमच्यासारख्ं आम्ही वागण्याचा प्रयत्न करतोय. कुटुंब म्हणून जगू लागलोय असे सांगतात. त्याच्यामुळे चांगला फरक अनेकांत पडला आहे. त्याचा मला खूप अभिमान आहे.’’अशा शब्दांत खासदार महाडिक यांनी उपस्थितांशी दिलखुलास संवाद साधायला सुरुवात केली. त्यांच्या भाषणा दरम्यान कधी वडिलकीच्या नात्याने मुलांना योग्य सल्ला देणे, मित्रत्वाच्या नात्याने चांगल्या कार्याचे कौतुक करणे, आणि एक नेता म्हणून लोकांसाठी सतत काम करत राहण्याची सूचना करणे त्यांच्यातील अशा विविध पैलूंचे दर्शन उपस्थितांना घडले.
कौटुंबिक नातेसंबंध उलगडताना महाडिक म्हणाले, ‘माझी तीनही मुले सोन्यासारखी आहेत. प्रत्येक जण जबाबदारीने वागतोय. महत्वाचं म्हणजे, सगळे निर्व्यसनी आहेत. पानसुपारी खात नाहीत. कोल्ड्रिक्स सुद्धा पीत नाहीत. माझ्या कामाचा पन्नास टक्के भाग मुलांनी उचलला आहे, तर पन्नास टकके भाग पत्नी अरुंधती यांनी उचलली आहे. त्यांच्यासोबत दोन्ही सुना आहेत. यामुळे मी सामाजिक, राजकीय व पक्षीय कामासाठी मुक्त आहे. मी, मुलांना नेहमी सांगत आलोय, एकटं पुढे जाऊ नका.सगळयांना बरोबर घ्या. सगळ्यांचा आदर करा. मित्र परिवाराला जप.”
आयुष्यातील प्रत्येक संकटावर मात करण्याची उर्मी अंगी हवी हे सांगताना खासदार महाडिक यांनी गेल्या काही वर्षातील त्यांच्या राजकीय जीवनातील अनुभव उपस्थितांशी शेअर केले. ते म्हणाले ‘मी आतापर्यत सहा निवडणुका लढविल्या. आणि जिंकल्या दोन. यशानं हुरळून जायचं नाही, अपयशानं खचायचं नाही. आयुष्यात वाईट प्रसंग आले म्हणून नाउमेद व्हायचे नाही. लोकसभेला मी हरलो, विधानसभेला अमल महाडिक पराभूत झाले. गोकुळची सत्ता गेली. माजी आमदार महादेवराव महाडिक यांची विधान परिषदेतील जागा गेली. एक वेळ अशी होती की विरोधक म्हणायचे, महाडिकांना कधीच गुलाल लागणार नाही. पण महाडिक म्हणजे धाडस’ हे आमचं सूत्र. आम्ही काम करत राहिलो, लोकांसाठी झटत राहिलो. लोकांनी भरभरून दिलं. ”
महाडिक म्हणाले, ‘आमदार, खासदार होण्यासाठी काम करावं हा उद्देश असू नये. सतत लोकांसाठी काम करण्याची वृत्ती हवी. कसलीही अपेक्षा न करता आपण काम करत राहायचं. कोल्हापूरने आम्हाला भरभरुन दिले आहे. मी काय होतो, सायकलवरुन कॉलेजला जाणारा तरुण. माझा राजकारणाशी काय संबंध ? मी कधी ग्रामपंचायतीची निवडणूक सुद्धा लढविली नाही. पण लोकांनी मला मोठं केलं. आज राज्यसभेचा खासदार. या सभागृहात देशभरातील क्लास आणि क्रीम मंडळी आहेत. एकवेळ लोकसभा खासदार झालो.कोणताही स्वार्थ न ठेवता काम करत राहिलं ना, लोक आपल्या पाठीशी राहतात. लोकांना आपली दु:ख सांगायची नाहीत. समाजासाठी काम करत राहायचं. जींवनात यश-अपयशासोबत आघातही होत असतात. सार्वजनिक जीवनात वावरताना टीका होत असते. ते तत्काळ विसरुन पुढे जायचे. विरोधक डाव टाकत असतात. ते उलथवून टाकायचे. मुळात आम्ही पैलवान. आपल्या रक्तात कुस्ती आहे. कोणी डाव टाकला तर प्रतिडाव टाकायचा. जीवनात पाप पुण्याचा हिशेब होत असतो. पुण्य वाटल्यास पदरात पुण्यच पडते ”असा वडिलकीचा सल्ला त्यांनी भाषणातून दिला.
कृष्णराज महाडिक यांच्याविषयी बोलताना खासदार महाडिक म्हणाले, ‘कृष्णराज आज अनेक आदर्शवत गोष्टी करतोय. त्याचा आम्हालाही सुखद धक्का बसतो. तो कचरा व्यवस्थापनसाठी काम करत आहे. कचरा प्रकल्प येथे गेला. गल्लोगल्ली फिरुन कचरा गोळा केला. लोकांना भेटतोय. त्याला हे सुचंत कसं ? याचे आश्वर्च वाटते. कमी वयात त्यांनी मोठी लोकप्रियता मिळवली आहे. त्याच्या समवयस्कामध्ये त्याच्याइतका पॉप्युलर दुसरा कोणी महाराष्ट्रात नसेल. लोकांसाठी काम करायची त्याची तळमळ आहे. कोल्हापूरकरांनी आजपर्यंत मला आशीर्वाद दिला..येथून पुढे कृष्णराजवर आशिर्वाद असोत. तो राजकारणातील उगवणारा सूर्य आहे.’ याप्रसंगी यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनीही आपले अनुभव सांगितले. ‘समाजकारण, राजकारणात एक व्हिजन ठेवून काम करत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीच्या कालावधीत मोठया लोकांचा सहवास लाभला. खूप काही शिकता आले. माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक यांच्यानंतर महाडिकांची तिसरी पिढी आता राजकारणात आहे. ही तिसरी पिढी राज्याचे नेतृत्व करेल.’असेही कृष्णराज म्हणाले.