के.पी.,अशोक जांभळे, संग्रामसिंह कुपेकर हे अजित पवारांच्या भेटीला
schedule28 Mar 25 person by visibility 79 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जिल्ह्यातील अनेक नेते मंडळीची पक्षप्रवेशाची चर्चा सुरू आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी (२७ मार्च २०२५) कोल्हापूर दौऱ्यावर होते. सर्किट हाऊस येथे त्यांना भेटण्यासाठी, निवेदन देण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली होती. माजी आमदारांनीही पवार यांची भेट घेतली. त्यांच्या राष्ट्रवादीच्या प्रवेशाची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. मात्र संबंधितांनी कामानिमित्त पवार यांना भेटल्याचे सांगितले. पवार यांच्यासोबत मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, शहराध्यक्ष आदिल फरास आदी उपस्थित होते.
राधानगरी –भुदरगडचे माजी आमदार व बिद्री साखर कारखान्याचे अध्यक्ष के. पी. पाटील यांनी पवार यांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्यासोबत बिद्री कारखान्याचे उपाध्यक्ष मनोज फराकटे, संचालक पंडितराव केणे, सूतगिरणीचे अध्यक्ष उमेश भोईटे, गोकुळचे संचालक किसन चौगले होते. इचलकरंजीचे माजी आमदार अशोक जांभळे यांनी पवार यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत सुहास जांभळे, लतिफ गैबान होते. राष्ट्रवादी इचलकरंजीचे बाबासाहेब देशमुख यांनी पवार यांची भेट घेतली.
…………
अनेकांची सदिच्छा भेट….निवेदनही दिले
काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी व राज्य बँकेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संग्रामसिंह कुपेकर, प्रा. मधुकर पाटील, यांनीही पवार यांना बुके दिले. मनसेचे राजू जाधव यांनी पवार यांना निवेदन दिले. कोल्हापूर शहर कुंभार माल वाहतूक उत्पादक सहकारी सोसायटीच्या शिष्टमंडळाने पवार यांना निवदेन दिले. यामध्ये भोगवटादार वर्ग दोनची जमीन वर्ग एकमध्ये रुपांतर करण्यासाठी रक्कम कमी करावी अशी मागणी केली. मनसेचे कार्यकर्ते राजू जाधव, भाजपाचे कार्यकर्ते विशाल शिराळकर, जयेंद्र गवळी यांनीही विविध मागण्यांचे निवेदन दिले.
……………….
शहर राष्ट्रवादीकडून विकासकामासाठी २५ कोटीची मागणी
कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन दिले. यामध्ये कोल्हापुरातील विविध विकासकामासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मिळावा अशी मागणी केली. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, माजी नगरसेवक महेश सावंत, परिक्षित पन्हाळकर, सतीश लोळगे, उत्तम कोराणे, जहिदा मुजावर, शीतल तिवडे आदी उपस्थित होते.