करवीरसाठी फेरमतमोजणी करताना एक किलोमीटरपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवावी !!
schedule07 Jan 25 person by visibility 1461 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विधानसभा २०२४ मधील निवडणुकीत पाच हजारपेक्षा कमी मतांनी पराभव झालेल्या उमेदवारांसाठी फेरमतमोजणी करावी असा अर्ज करण्यात आला आहे. करवीर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार राहुल पी पाटील यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला आहे. त्या मागणीनुसार फेरमतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतमोजणी ठिकाणापासून एक किलोमीटर अंतरापर्यंत इंटरनेट सेवा पूर्ण बंद ठेवावी अशी मागणी कोल्हापूर जिल्हा काँग्रेस सेवा दलाने केली आहे.
सात जानेवारीच्या मध्यरात्रीपासून फेरमतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत इंटरनेट सेवा बंद राहावी अशी मागणी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. काँग्रेस सेवादलाचे जिल्हाध्यक्ष रंगराव देवणे, सेवादलाचे शहराध्यक्ष संजय पोवार वाईकर, सेवादलाच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा शोभा बाजीराव पाटील, संदीप सर्जेराव कोले, बाजीराव हरी पाटील, संभाजी दत्तात्रय इंगवले, संजय केरबा पाटील, तौसिफ राजू पटेकर यांनी उपजिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी समाधान शेंडगे यांना निवेदन दिले.
करवीर विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अटीतटीची झाली. महायुतीकडून चंद्रदीप नरके व महाविकास आघाडीकडून राहुल पी पाटील यांच्यामध्ये निवडणूक झाली. शेवटच्या फेरीपर्यंत निकालाचे पारडे हेलकावत होते. या लढतीत महायुतीकडून लढणारे शिवसेनेचे उमेदवार चंदद्रीप नरके हे विजयी झाले. नरके यांना एक लाख ३४ हजार ५२८ तर इतकी मते मिळाली. तर राहुल पाटील यांना एक लाख ३२ हजार ५५२ इतकी मते मिळाली. नरके हे १९७६ मतांनी विजयी झाले आहे. या मतदारसंघात फेरमतमोजणी घ्यावी अशी मागणी काँग्रेसने केली आहे.