वारणा महाविद्यालयात कॅन्सर संशोधनाला आंतरराष्ट्रीय पेटंट
schedule18 May 25 person by visibility 60 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर येथील रसायनशास्त्र विभागातील डॉ. राजकुमार पांडव, प्रा. सत्यनारायण आर्डे, प्रा. उत्तम कदम, गीतांजली गुरव व श्री. राहुल घारगे यांनी विकसित केलेल्या ब्रेस्ट कॅन्सरवरील उपचारास उपयुक्त नॅनोकणांच्या निर्मिती पद्धतीला जर्मन सरकारकडून आंतरराष्ट्रीय पेटंट प्राप्त झाले आहे.
या संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागाचे प्रमुख प्रा. (डॉ.) कैलास सोनवणे आणि ज्येष्ठ प्रा. डॉ. कल्याणराव गरडकर यांचे मार्गदर्शन लाभले. या संशोधनाबद्दल वारणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विलास कारजीन्नी यांनी संशोधकांचे अभिनंदन केले. महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच जर्मन आंतरराष्ट्रीय पेटंट मिळाल्यामुळे संस्थेच्या आणि महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. संशोधकांनी केलेल्या नाविन्यपूर्ण कार्याचा उपयोग समाजासाठी व्हावा, अशी अपेक्षा संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉ. कोरे यांनी व्यक्त केली.
ब्रेस्ट कॅन्सर हा महिलांमध्ये आढळणाऱ्या प्रमुख कॅन्सरपैकी एक असून, यामुळे दरवर्षी लाखो महिलांची जीवीतहानी होते. अनेक रुग्णांमध्ये उशिरा निदान होणे, पारंपरिक उपचारांचे मर्यादित परिणाम, आणि पुनरावृत्तीची शक्यता ही मोठी आव्हाने आहेत. त्यामुळे अचूक निदान, कमी दुष्परिणाम असलेले उपचार आणि टार्गेटेड थेरपीसारख्या नवीन उपचार पद्धतींची नितांत गरज आहे. संशोधनातून निर्माण होणाऱ्या नव्या उपायांनी रुग्णांचे आयुष्य वाढवण्यास आणि जीवनमान सुधारण्यास मोठी मदत होऊ शकते. या संकल्पनेतून सिल्व्हर-झिंक ऑक्साईड नॅनो कॉम्पोझिट वापरून संशोधकांनी ब्रेस्ट कॅन्सरवर किमोथेरपीपेक्षा प्रभावीपणे उपचार करता येणे शक्य असल्याचे सिद्ध केले आहे.
संलग्नित महाविद्यालयाना संशोधन कार्य मदतीसाठी शिवाजी विद्यापीठ नेहमीच अग्रेसर आहे अशा शब्दात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी संशोधकांचे अभिनंदन केले. महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक विविध विषयांवर सातत्याने उच्चस्तरीय संशोधन करत असून, रसायनशास्त्र विभागाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व संशोधनसाठी उल्लेखनीय कार्य केले आहे अशा शब्दात वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एम. शेख आणि रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ. बी. एस. शिर्के यांनी संशोधकांचे अभिनंदन केले.