जिल्ह्यातील हॉटेल, बार, दारु दुकाने रात्री अकरानंतर बंद ! जिल्हा प्रशासनाचा आदेश
schedule21 Oct 24 person by visibility 522 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रातील सर्व हॉटेल, धाबे, रेस्टॉरंट, बार, परमिट रुम, देशी, विदेशी दारु दुकाने हे २१ ऑक्टोबर २०२४ पासून विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात येईपर्यंत रात्री अकरानंतर बंद करण्याचे आदेश अपर जिल्हादंडाघिकारी संजय तेली यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणा-या व्यक्ती फौजदारी कारवाईस पात्र राहतील असेही त्यांनी म्हटले आहे.
सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. विधानसभा निवडणूक कालावधीत आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी तसेच निवडणूक प्रक्रिये दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी प्रशासनाने हा आदेश काढला आहे.
आदेशात म्हटले आहे, ‘ निवडणूक कालावधीत मतदारांना आमिषे दाखविण्याकरीता मोठ्या प्रमाणात दारुचे वाटप व जेवणावळींचे आयोजन केले जाते. ब-याच वेळा सांकेतिक चिन्ह, शब्दांचा वापर करुन परस्पर मतदार, कार्यकर्त्यांंची हॉटेल, बार, परमिट रुम याठिकाणी मोठ्या प्रमाणात सोय केली जाते. सर्वसामान्यत: रात्री दहा नंतर प्रचार समाप्त झाल्यानंतर उशिरापर्यंत कार्यकर्ते व मतदार यांची हॉटेल, धाबे, रेस्टॉरंट, बार, परमिट रुम, दारु दुकाने आदी ठिकाणी सोय केली जाते.
अशा आस्थापना रात्री उशीरापर्यंत सुरु राहिल्यास पक्ष संघटनेचे कार्यकर्ते हे या ठिकाणी रात्री उशीरा जाऊन मद्य प्राशन व भोजन करतात त्यानंतर त्या ठिकाणी पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये व गटागटामध्ये संघर्ष किंवा वादावादी होऊन मारामारी होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याचे तीव्र पडसाद उमटू शकतात.
तसेच अशा ठिकाणी गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक, राजकीय गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक, समाज विघातक प्रवृत्ती यांचा मोठ्या प्रमाणात वावर होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन आदर्श आचारसंहितेवर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. तसेच विविध कारणावरुन कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाबरोबर आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीमध्येही अडथळे निर्माण होतात. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे व प्रभावीपणे पालन करण्यासाठी रात्री उशीरा पर्यंत सुरु राहणा-या कोल्हापूर जिल्हा कार्यक्षेत्रातील हॉटेल, धाबा, रेस्टॉरंट, परमिट रुम, बार व देशी/विदेशी दारु दुकाने अशा आस्थापनांवर या आदेशान्वये वेळेचे निर्बंध घालण्यात आले आहेत. ’