शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी हिंदुत्ववादी संघटनांचा मोर्चा
schedule17 Mar 25 person by visibility 136 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाचे, ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’असे नामविस्तार करावे या मागणीसाठी सकल हिंदू राष्ट्र समन्वय समितीतर्फे सोमवारी (१७ मार्च २०२५) कोल्हापुरात मोर्चा काढण्यात आला. शहरातील विविध भागातून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.
‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार जाहीर करावे. महिनाभरात नामविस्ताराचा निर्णय झाला नाही तर विधानभवनावर मोर्चा काढू’असा इशारा तेलंगणा येथील आमदार राजासिंह ठाकूर यांनी दिला. या सभेत बोलताना अभय वर्तक यांनी, ‘कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता ?’ या पुस्तकावर बंदी घालावी. या पुस्तकात छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केला आहे.’असे मत मांडले. सभेत सुभेदार तानाजी मालुसरे यांचे वंशज कुणाल मालुसरे, सुनील घनवट, माजी नगरसेवक सत्यजित कदम, भाजप महिला आघाडीच्या अध्यक्षा रुपाराणी निकम, छत्रपती ग्रुपचे प्रमोद पाटील यांची भाषणे झाली.
तत्पूर्वी दसरा चौक, लक्ष्मीपुरी, व्हिनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात ढोल-ताशा पथक, मर्दानी खेळ, शिवकालीन युद्धपथक, वारकरी-टाळकरी यांचे पथक, विविध संप्रदायांचे भक्त, मावळ्यांची वेशभूषा यांसह पारंपरिक वेशभूषा, महिलांचे रणरागिणी पथकाचा सहभाग होता. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना निवेदन दिले. वीर शिवा काशीद यांचे वंशज आनंद काशीद,हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते अभिजित पाटील, गजानन तोडकर, राजू तोरस्कर, राजू यादव, अरुण गवळी, संजय हसबे, उदय भोसले, किशोर घाटगे, डॉ. मानसिंग शिंदे, ह शिवानंद स्वामी आदी उपस्थित होते.