सरकारला ताकत द्या, लाडकी बहिण योजनेची रक्कम तीन हजार करू - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
schedule10 Oct 24 person by visibility 207 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्यातील महायुती सरकार हे सर्वसामान्यांंचे आहे. समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी काम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. महायुती सरकार हे देणारे आहे, घेणारे नाही. सरकारला ताकत द्या, लाडकी बहिण योजनेची रक्कम तीन हजारपर्यंत वाढवू. महाराष्ट्रातील लाडकी बहिण लखपती झाली पाहिजे ही आमची धारणा आहे.’अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात दिली.
कोल्हापूर महानगरपालिकातंर्गत विविध विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा असा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला होता. दसरा चौक येथील मैदानावर आयोजित समारंभात मुख्यमंत्र्यांनी रिमोटद्वारे ऑनलाइन पद्धतीने विकासकामांचा शुभारंभ केला. याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘गेल्या ५० वर्षात कोल्हापूरला विकासकामासाठी जेवढा निधी मिळाला नाही त्याहून अधिक निधी गेल्या दोन वर्षात महायुती सरकारने दिला आहे. हजारो कोटी रुपयांच्या विकासकामातून कोल्हापूरच्या विकासाचे नवे पर्व सुरू आहे. कोल्हापूरचे नाव देशाच्या नव्हे तर जागतिक पटलावर उमटविण्यासाठी प्रयत्नशील आहोत’अशा शब्दांत त्यांनी कोल्हापूरकरांना आश्वस्त केले. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे यासाठी हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांची भेट घेतली आहे. येत्या काही दिवसात हा विषय मार्गी लागेल असेही ते म्हणाले.
कोल्हापुरातील विकासकामासाठी मंजूर निधीची आकडेवारी सांगताना मुख्यमंत्री म्हणाले, ‘कोल्हापूरच्या पूरनियंत्रणासाठी ३२०० कोटींचा निधी मंजूर केला आहे. या माध्यमातून पुराचे संकट कायमस्वरूपी दूर होईल. कोल्हापूर येथे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यासाठी २७७ कोटी रूपये, अमृत योजना पहिल्या टप्प्यासाठी १५२ कोटी, अमृत दोन योजनेच्या दुसरा टप्प्यासाठी १३९ कोटी, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणीसाठी २५ कोटी, रस्ते बांधणीसाठी १०० कोटी अशा माध्यमातून कोल्हापूरचे विकास प्रकल्प पुढे नेत आहोत, असे शिंदे म्हणाले.
लाडकी बहिण योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांचा मुख्यमंत्र्यांनी भाषणात समाचार घेतला. लाडकी बहिण योजना प्रचंड लोकप्रिय झाली आहे. यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. महायुती सरकार हे हप्ते देणारे सरकार आहे, हप्ते घेणारे नाही. लोकांना फेस टू फेस भेटून काम करण्याची आमची पद्धत आहे.फेसबुक लाइव्हवर चालणारे सरकार नाही.’ असा टोला शिंदे यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगाविला.
शिंदे म्हणाले, ‘ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून दोन कोटी ३० लाख महिलांच्या खात्यात १७ हजार कोटी रूपये जमा करण्यात आले आहेत. ही योजना कायमस्वरूपी चालू राहणार आहे. या योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते दिले आहेत. ऑक्टोबर व आगामी नोव्हेंबर महिन्याचा हप्ताही आचारसंहितेपूर्वी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. या माध्यमातून अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. आता महिलांना लखपती करण्याचे सरकारचे ध्येय आहे. ’
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी कोल्हापूरसाठी भरीव प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. तसेच, २०१९ च्या पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या मदतीचे स्मरण केले. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे ललित गांधी, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, रवींद्र माने, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, शिवसेनेचे शिवाजी जाधव, रणजित जाधव, किशोर घाटगे, सुनील जाधव, वैशाली क्षीरसागर, ऋतुराज क्षीरसागर आदी उपस्थित होते.