चार फुटी शेंगेचा वेल, समुद्रीय घोळ, दगडावर वाढणारा जैताळू ! रानभाज्या उत्सव ठरतेय आकर्षण !!
schedule24 Aug 24 person by visibility 648 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : निसर्गात वनस्पतींची विविधता विपुल प्रमाणात. रानभाज्यांची संख्या तर मोठी. पण त्याविषयी शहरवासिय अनभिज्ञ. दरम्यान अवतीभवती आढळणाऱ्या, औषधीगुणांनी युक्त आरोग्यवर्धक रानभाज्यांचे दालन कोल्हापुरात उघडले आहे. दसरा चौक येथील जैन बोर्डिंगच्या सभागृहात २४ व २५ ऑगस्ट रोजी भरलेल्या या प्रदर्शनात गारंबीचीी चार फुटी शेंगेचा वेल, सागर किनाऱ्यावरील समुद्रीय घोळ, दगडावर वाढणारा जैताळू यांच्यासह तब्बल १६० हून अधिक रानभाज्या या प्रदर्शनात मांडल्या आहेत.
प्रदर्शनस्थळी रानभाज्यांची चव चाखता यावी म्हणून प्रदर्शनस्थळी खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत. शिवाय रानभाज्या आणि त्यांची रोपे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. रानभाज्यांची बियाणे व तरु वापरुन त्यांची रोपे कुंडयात तयार केली आहेत. अशा रानभाज्यांच्या कुंडया प्रदर्शनात आहेत. एनजीओ कंपॅशन २४, कोल्हापूर वुई केअर आणि निसर्ग अंकुर यांच्या संयुक्त विद्यमाने या दोनदिवसीय रानभाज्यांचे प्रदर्शन भरविले आहे.
कृषी अधिकारी उमेश पाटील, मुद्रांक जिल्हाधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.. निसर्ग अंकुरचे प्राचार्य मधुकर बाचुळकर, कोल्हापूर वुई केअरचे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी रानभाज्यांचे प्रदर्शन भरविण्यामागील उद्देश सांगितला. प्रदर्शनात मांडलेल्या रानभाज्यांची माहिती ही दर्शविली आहे.
प्रदर्शनात निसर्गात दुर्मिळ असणाऱ्या गारंबीची चार फुटी शेंग, टेटूची तलवारीसारखी दोन फुटी शेंग, खाजकुहीलीचे वेल, शेरणी, चन्नीचे वेल, सोनार वेल, कांडयाचित्रक, गाजरीची भाजी, खरशिंग शेंगा, कडवी, अमरकंद,नळीची भाजी, समुद्रशोक, दगडावर वाढणारा जैताळू, खडक अंबाडी, गिरजाला, सागरी किनाऱ्यावर वाढणारी समुद्रीय घोळ या रानभाज्या प्रदर्शनात मांडल्या आहेत. वृक्षांवर उगवणारा अळू, तीनतोंडी, मांजरी, बाफेली, सफेद, मुसळी, कडवी, कोळयाची माड या दुर्मिळ रानभाज्या आहेत. तसेच करटोली, दिंडा कुडा, आंबुशी, पाथरी, कुरडू, बांबू, कोंब, रानगवर, केना, पानांचा ओवा, कपाळफोडी, चिवळ, आघाडा, काटेमाळ, घोळभाजी, अंबाडा, सुरण, टाकळा, मटारु, भुई, आवळी, भारंगी या औषधी गुणांनीयुक्त आरोग्यवर्धक रानभाज्या प्रदर्शनात मांडल्या आहेत.
हे प्रदर्शन सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत खुले आहे. प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी प्रदर्शनाचे प्रोजेक्ट चेअरमन सुशांत टक्कळकी, को-चेअरमन अमृता वासुदेवन, निसर्ग अंकुरचे उपाध्यक्ष डॉ. अशोक वाली, गार्डन क्लबच्या पल्लवी कुलकर्णी, इनरव्हील क्लबच्या स्मिता सावंत, अभिजीत पाटील, सुशिल रायगांधी, किशोर शिंदे, स्मिता शिंदे, सलीम बैरागदार, स्मिता घोसाळकर, कविता घाटगे, भूषण पाटील, राजू तेली, प्रा. डॉ.एन डी पाटील महाविद्यालय मलकापूर येथील वनस्पती शास्त्रविभाग प्रमुख डॉ. मकरंद ऐतवडे आदी उपस्थित होते. दरम्यान प्रदर्शनात रविवारी दुपारी बारा वाजता रानभाज्यांच्या पाककृती स्पर्धा आहेत.