राजेश क्षीरसागरांचा पाठपुरावा, मुख्यमंत्र्यांचा आदेश ! रोजंदारी बनले कायमस्वरुपी, कर्मचाऱ्यांचा गुलाल उधळत जल्लोष !!
schedule10 Oct 24 person by visibility 285 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : काही जण वीस वर्षापासून नोकरी करत होते, तर काही जण पंधरा वर्षे कामावर. जवळपास पाचशेहून अधिक कर्मचारी. महापालिकेत रोजंदारी म्हणून कार्यरत. त्यांना एकच आशा, आज ना उद्या कायमस्वरुपी होऊ. त्यांच्या नेमक्या अडचणी, विवंचना आणि कायमस्वरुपी कामगार होण्यासाठीची धडपड राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पाहिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांनी, बुधवारी ९ ऑक्टोबर रोजी कोल्हापूर दौऱ्यात महापालिकेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करण्याचा आदेश दिला. आचारसंहिते अगोदर त्यासंबंधीची पूर्तता करण्याचे आदेश महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना दिले. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशाने कर्मचाऱ्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. भर पावसात गुलाल उधळत, फेर धरत त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
महापालिकेत यापूर्वी १९९८-९९ मध्ये ६०० हून अधिक रोजंदारी कामगार कायमस्वरुपी झाले होते. त्याकाळीही शिवसेना-भाजप युतीचे सरकार होते. त्यानंतर रोजंदारी कामगारांची कायमस्वरुपी नियुक्ती लटकली होती. आज ना उद्या आपण कायमस्वरुपी होणार म्हणून रोजंदारी कामगार काम करत होते. विविध विभागात रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांची संख्या ५०० हून अधिक आहे. या मंडळींच्या व्यथा, अडचणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष क्षीरसागर यांनी जाणून घेतल्या. त्यांनी महापालिकेत येऊन अधिकारी वर्गासोबत, कामगार संघटनेच्या प्रतिनिधीसोबत चर्चा केली. प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना केल्या. आणि मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला.
मुख्यमंत्री शिंदे हे बुधवारी, कोल्हापूर दौऱ्यावर होते. रोजंदारी कामगारांना न्याय मिळावा, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी क्षीरसागर प्रयत्नशील होते. मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यातही शहरातील विविध विषयाकडे लक्ष वेधताना त्यांनी रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरुपी नियुक्तीचा विषय लावून धरला. मुख्यमंत्री शिंदे हे भाषण करत असताना राजेश क्षीरसागर यांनी चार ते पाच वेळा खुर्चीवरुन उठून मुख्यमंत्र्यांच्याजवळ गेले. रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीच्या विषयासंबंधी चिठ्ठी दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी तत्काळा हा विषय मार्गी लावला जाईल. रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी करण्याचा आदेश निघेल. काही काळजी करायची नाही. अशा शब्दांत उपस्थितांना आश्वस्त केले. आयुक्तांना व्यासपीठावर बोलावून आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या कर्मचाऱ्यांना कायमस्वरुपी नेमणुकीसंबंधीची प्रक्रिया पूर्ण करावी अशी सूचना केली. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशाने रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या आनंदाला भरते आले. भर पावसात गुलाल उधळत, नृत्य करत त्यांनी आनंद साजरा केला. महिला कर्मचाऱ्यांच्या डोळयातून आनंदाश्रू तरळले. महापालिका कर्मचारी संघातर्फे, मुख्यमंत्री शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.