विद्या प्रबोधिनीत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते यूपीएससीतील यशवंतांचा सन्मान
schedule02 May 25 person by visibility 40 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेतून उत्तीर्ण झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील बिरदेव डोणे, दिलीपकुमार देसाई व हेमराज पनोरेकर यांचा सत्कार उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडला. विद्या प्रबोधिनी येथे झालेल्या कार्यक्रमात मंत्री पाटील यांनी यशवंतांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक बांधिलकी जपत कल्पक प्रशासक व्हावे. संयम आणि सातत्य हीच यूपीएससी परीक्षेतील यशाची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी नमूद केले.
बीटेक सिविल पदवी घेतलेल्या श्री.बिरदेव डोणे यांनी अभ्यासाचे एक शिस्तशीर नियोजन आखून त्यामध्ये सातत्य राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मोबाईल आणि इतर सर्व प्रकारच्या प्रलोभनांपासून दूर राहिल्याचा फायदा झाल्याचा ते म्हणाले. दिलीपकुमार देसाई म्हणाले, यापूर्वी एकूण तीन वेळा मुलाखतीसाठी पात्र ठरलो पण यशाने हुलकावणी दिली मात्र संयम राखून तयारी करत राहिल्याने अखेर यश खेचून आणू शकलो.
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची बीए पदवी घेणारे हेमराज पानोरेकर यांचा हा यूपीएससीचा चौथा प्रयत्न होता. कोल्हापूरमधील आपल्या राहत्या घरीच तयारी करून उत्तीर्ण झालेले हेमराज यांनी स्वतावर विश्वास ठेवून तयारी केल्यास कोल्हापूर मध्ये राहून देखील यश मिळवता येते हे सिद्ध करून दाखवले आहे..
विद्या प्रबोधिनी राबवत असणाऱ्या युपीएससी शिष्यवृत्तीचा आम्हाला तयारी काळात मोठा हातभार लागल्याची भावना यावेळी तीनही यशवंतांनी बोलून दाखवली. महाराष्ट्रातील इतर विविध भागातून शिष्यवृत्तीमधील एकूण अठरा विद्यार्थी यंदा युपीएससी उत्तीर्ण झाले आहेत. इथून पुढेही युपीएससीची तयारी करू इच्छिणाऱ्या महाराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी प्रबोधिनी विविध शिष्यवृत्ती योजना राबवणार असल्याचे प्रबोधिनीचे संचालक राजकुमार पाटील म्हणाले.