फैरी झडू लागल्या, प्रभाग रचनेवरुन काँग्रेसचा सत्ताधाऱ्यांवर आरोप
schedule19 Jun 25 person by visibility 12 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी मंडळी काही कारभारी व सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या मदतीने हवी तशी प्रभाग रचना करण्यासाठी प्रयत्नशील आहेत असा आरोप काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी केला. महापालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी यांना निवेदन दिले. महापालिकेची प्रभाग रचना करताना सत्ताधाऱ्यांचा दबाव घेऊ नका. प्रभाग रचनेत पारदर्शकता असावी असे निवेदनात म्हटले आहे.
काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांची भेट घेतली. माजी उपमहापौर संजय मोहिते, प्रतापसिंह जाधव, भूपाल शेटे, इंद्रजीत बोंद्रे, श्रावण फडतारे, जय पटकारे, दुर्वास कदम, शिवानंद बनछोडे, धीरज पाटील, दिग्विजय मगदूम, अभिजीत देठे, फिरोज सौदागर, उमेश पोवार, उत्तम शेटके, रियाज सुभेदार, संजय लाड आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.
निवेदनात म्हटले आहे, ‘प्रभाग रचनेवरुन कर्मचाऱ्यांवर दबाव आणला जात आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली जाते. राजारामपुरीतील काही ठिकाणाहून प्रभाग रचनेचे नियोजन सुरू आहे. त्यामध्ये महापालिकेतील काही निवृत्त अधिकारी सामील आहेत.’असे म्हटले आहे. तसेच हद्दवाढीचा प्रस्ताव हा प्रशासकाच्या स्वाक्षरीने द्यावा. या प्रक्रियेसाठी एक स्वतंत्र अधिकारी नेमावा अशी मागणी केली. अग्निशमन विभागातील रिक्त पदे भरावीत, ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना कायम करावे अशी मागणी केली यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता हर्षजीत घाटगे उपस्थित होते.