प्रारूप मतदार याद्यांवरील हरकतींसाठी मुदतवाढ द्या : भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव
schedule24 Nov 25 person by visibility 33 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकच्या प्रारूप मतदार याद्यावर हरकती घेण्यासाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे ईमेलद्वारे केली आहे. प्रारूप मतदार याद्यांवर हरकती घेण्याची मुदत २७ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. कोल्हापूर महापालिका म्हणून यावर्षी प्रथमच चार सदस्यीय प्रभाग रचना झाली आहे. विधानसभा बूथ निहाय विभागणी केल्यामुळे या याद्यांमध्ये आपले नाव शोधताना मतदार गोंधळून गेला आहे. प्रभागातील हजारो नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेली आहेत. यामुळे अनेक मतदार मतदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. तसेच एका पेक्षा जास्त मतदारांच्या हरकती घेण्यासाठी महापालिकेकडून प्रत्येक मतदाराचा वेगळा फॉर्म भरण्याचा हट्ट करण्यात येत आहे हे सुद्धा अत्यंत चुकीचे आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर प्रारुप मतदार याद्यांवर हरकती घेण्यासाठी १० दिवसांची मुदतवाढ मिळावी त्याचबरोबर एका पेक्षा जास्त मतदारांच्या हरकती असल्यास सामूहिकरीत्या तक्रार अर्ज घेऊन त्यांच्या हरकती स्विकारण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. जाधव यांनी यासंबंधीचे निवेदन महापालिका प्रशासनालाही दिले आहे.