डीवाय पाटील हॉस्पिटलमध्ये गुंतागुंतीची मेंदूची शस्त्रक्रिया यशस्वी
schedule13 Sep 24 person by visibility 190 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
कदमवाडी येथील डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये दोन महिलावर मेंदूच्या गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या . डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे न्यूरोसर्जन डॉ. उदय घाटे, डॉ. सागर जांभीलकर, भूल तज्ञ डॉ.संदीप कदम, डॉ अमृता व सहकाऱ्यांनी या शस्त्रक्रिया केल्या. विशेष म्हणजे महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेतून या दोन्ही शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या आहेत.
एका ५० वर्षीय महिलेची गेल्या ५ – ६ महिन्यापासून दृष्टी अंधुक होत असल्याची तक्रार होती. या महिलेने डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये तपासणी केली असता डोळ्याच्या मागे ट्युमर असल्याचे निदान झाले. न्यूरोसर्जन डॉ. उदय घाटे व डॉ. सागर जांभीलकर यानी या महिलेच्या दोन्ही नसांवर मायक्रोस्कोपिक सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया अतिशय जोखमीची होती. यामध्ये रूग्णाची वाचा जाण्याचा तसेच पक्षाघाताचा धोका होता. मात्र, हॉस्पिटलच्या टीमने तब्बल ६ तास ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून या महिलेची दृष्टी पूर्ववत करण्यात यश मिळवले.
अशाच एका ५५ वर्षीय महिलेला डोक्यात दुखण्याचा त्रास होत होता. कोणत्याही प्रकारच्या मार वैगरे बसलेला नसतानाही डोक्यातील तीव्र वेदनामुळे त्यांनी तपासणी करून घेतली. त्यांना अॅनुरीझम म्हणजे मेंदूतील रक्तवाहिनीला फुगा येऊन तो फुटल्याने रक्तस्त्राव झाल्याचे निदान झाले. हा प्रकार पुन्हा होण्याचा शक्यता व त्यात रूग्णाच्या जीवाला धोका असतो. मात्र डॉ. घाटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे आव्हान स्वीकारून शस्त्रक्रिया करून क्लिपिंग करण्याचा निर्णय घेतला. मेंदूत रक्तस्त्राव सुरु असताना मेंदूच्या तळाशी जाऊन रक्तवाहिनीला क्लिप लावणे हे खूपच जोखमीचे होते. यामध्ये रक्तवाहिनी फुटण्याचा तसेच पॅरालेसीस होण्याचा धोका होता. मात्र तब्बल ८ तास ही गुंतागुंतीची आणि जोखमीची शस्त्रक्रिया करत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या महिलेला पुनर्जन्मच दिला.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, वैद्यकीय अधीक्षका डॉ. वैशाली गायकवाड यांनी यशस्वी शस्त्रक्रिया व उपचार करणाऱ्या सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.