बुद्धिबळपटू तन्मयी, चतुर्थी, मायशा, सिद्धांत, रुहान,विवान व कुशाग्रची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
schedule23 Aug 25 person by visibility 275 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ॲड.पी आर मुंडरगी स्मृती एच टू ई महाराष्ट्र राज्य तेरा वर्षाखालील मुला-मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धा झाल्या. या स्पर्धेच्या अंतिम आठव्या फेरीनंतर मुलांच्या गटात चौथा मानांकित पुण्याचा सिद्धांत साळुंकेने आठ पैकी साडेसात गुण मिळवून अजिंक्यपद पटकावले. दहावा मानांकित मुंबईचा रुहान माथुरने सात गुणासह उपविजेतेपद संपादन केले. सातवा मानांकित कोल्हापूरचा विवान सोनीने साडेसहा गुणासह तृतीय क्रमांक पटकाविला तर आठवा मानांकित नागपूरच्या कुशाग्र पालीवालने चौथे स्थान स्थान मिळविले. मुलींच्या गटात चौदावी मानांकित सातारची तन्मयी घाटे ने सात गुण मिळवून स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले. दहावी मानांकित पुण्याची चतुर्थी परदेशीने साडेसहा गुणासह उपविजेतेपद मिळविले तर अग्रमानांकित मुंबईच्या मायशा परवेज ला साडेसहा गुण मिळवून ही कमी टायब्रेक गुणामुळे तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. या सर्वांची गोवा येथे तीन ते नऊ सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या तेरा वर्षाखालील राष्ट्रीय निवड बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
महालक्ष्मी बॅंकेचे अध्यक्ष रवी शिराळकर, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष आनंद माने, युनिव्हर्सल सेक्युरिटी सर्व्हिसेसचे कॅप्टन उत्तम पाटील, ब्राह्मण सभा करवीर मंगलधामचे अध्यक्ष डॉ. उदय कुलकर्णी, शाहू मॅरेथॉन व बिनखांबी गणेश मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष किसन भोसले, कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्रा. अरुण मराठे, महालक्ष्मी बँकेचे संचालक कृष्णा काशीद, राजन देशपांडे, श्रीकांत लिमये व संतोष कडोलीकर यांच्या हस्ते स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर चेस असोसिएशन कोल्हापूरचे भरत चौगुले, मनीष मारुलकर, धीरज वैद्य उत्कर्ष लोमटे, प्रीतम घोडके,अनिश गांधी व आरती मोदी उपस्थित होते. विजय माने यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सांगलीच्या आंतरराष्ट्रीय पंच पौर्णिमा उपळावीकर यांची नियुक्ती महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेने केली होती. त्यांना मनिष मारुलकर, करण परीट, आरती मोदी, रोहित पोळ,रवींद्र निकम, प्रशांत पिसे यांनी सहाय्य केले.