आईच्या विरहाने बहिण-भावाने जीवनयात्रा संपविली, राजाराम तलावात आत्महत्या
schedule15 Aug 24 person by visibility 799 categoryगुन्हे
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
अडीच महिन्यापूर्वी आईचे निधन झालेले. आईच्या पश्चात भाऊ-बहिण दोघेच. दोघांचा एकमेकाला आधार. पण आईच्या निधनाचा विरह त्या भावडांना सहन झाला नाही. त्या दोघांनी राजाराम तलावात उडी टाकून जीवनयात्रा संपविली. पंधरा ऑगस्ट, गुरुवारी हा प्रकार समोर आला. भूषण नीळकंठ कुलकर्णी (वय ६१ वर्षे) आणि भाग्यश्री नीळकंठ कुलकर्णी (वय ५७ वर्षे) यांनी तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना साऱ्यांच्याच मनाला चटका लावणारी ठरली.
राजारामपुरी पोलिस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी, ‘भूषण आणि भाग्यश्री कुलकर्णी हे भाऊ-बहिण जुनी मोरे कॉलनी नाळे कॉलनी येथे राहावायस होते. अडीच महिन्यापूर्वी त्यांच्या आई पद्मजा यांचे निधन झाले. आईच्या निधनानंतर हे दोघे बहिण-भाऊ नैराश्यात होते असे पोलिस तपासात पुढे आले आहे. आईच्या निधनाचा विरह त्या भावडांना सहन झाला नाही. नैराश्यातून त्या दोघांनी राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
गुरुवारी, सकाळी त्या दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसले. नागरिकांनी त्यासंबंधीची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह बाहेर काढले. त्यांच्या मृतदेहाजवळ एक सुसाईड नोट मिळाली आहे. त्यामध्ये त्या भावडांची नावे आहेत. आईच्या निधनामुळे आलेले नैराश्य व विरह सहन न झाल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे सुसाईड नोटमध्ये उल्लेख केला आहे. या घटनेला कोणालाही जबाबदार धरू नये असे म्हटल्याचे समजते. घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर दोन्ही मृतदेह तपासणीसाठी सीपीआरला पाठविले.’