अलमट्टी धरणाच्या उंचीच्या विरोधात सर्वपक्षीयांचे चक्काजाम आंदोलन, खासदार-आमदारांचा महामार्गावर ठिय्या!
schedule18 May 25 person by visibility 158 categoryराजकीय

सरकारने बोलावली बुधवारी बैठक, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रालयात होणार चर्चा!!
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयाविरोधात कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते एकवटले. कर्नाटक सरकारचा निर्णय हा शेतकरी व नागरिकांसाठी जीवघेणा आहे. अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याला कायम विरोध राहील. जीव गेला तर बेहत्तर पण उंची वाढवू देणार नाही असा सज्जड दमही सर्वपक्षीय नेते मंडळींनी दिला. अलमट्टी धरणाची उंची वाढली की पश्चिम महाराष्ट्रात महापुराचा विळखा वाढणारा याहे याकडेही नेते मंडळींनी लक्ष वेधले.
कोल्हापूर –सांगली दरम्यानच्या उदगाव येथील महामार्गावर रविवारी (१८ मे २०२५) सर्वपक्षीयांतर्फे चक्का जाम अंदोलन पुकारले होते. महामार्गावर ठिय्या मारल्याने वाहतुकीची कोंडी झाली. तब्बल तीन तासानंतर पाटबंधारे विभागाकडून बुधवारी (२१ मे) मंत्रालयात संबंधितांची बैठक बोलावली. पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक होणार आहे. यासंबंधीचे पत्र मिळाल्यानंतर चक्काजाम आंदोलन मागे घेण्यात आले.
खासदार धैर्यशील माने, खासदार विशाल पाटील, आमदार सतेज पाटील, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार विश्चजीत कदम, आमदार राहुल आवाडे, आमदार अरुण लाड, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार प्रकाश आवाडे, उल्हास पाटील, राजू आवळे, गणपतराव पाटील, रजनी मगदूम, पी. एम. पाटील, सावकर मादनाईक, विक्रांत पाटील –किणीकर, धनाजी चुडमुंगे, डॉ. नीता माने, भारत पाटील भुयेकर, बाबासाहेब देवकर, राजेंद्र सुर्यवंशी, सर्जेराव पाटील, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, सागर कोंडेकर आदींच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन झाले. आममदार विश्वजीत कदम यांनी, ‘महाराष्ट्र सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा. प्रसंगी सुप्रीम कोर्टात जाऊन धरणाची उंची वाढविण्याचा जो घाट कर्नाटक सरकारने घातला आहे, तो हाणून पाडावा.’
…………………………..
‘ अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या विरोधात पुकारलेल्या आंदोलनात सर्वपक्षीय एकवटले आहेत. राज्य सरकारने केवळ घोषणा करू नये. ठोस भूमिका घ्यावी. महाराष्ट्र सरकारने कणखर भूमिका घ्यावी. उंची वाढविण्याचा निर्णय रद्द झाला नाही तर आम्ही अलमट्टी धरणावर धडक मारु.’
- सतेज पाटील आमदार काँग्रेस