बासुरी वाजवतच रुग्णाची मेंदूची जटील शस्त्रक्रिया सिद्धगिरी हॉस्पिटलमध्ये यशस्वी
schedule05 Sep 24 person by visibility 507 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : एका बाजूला रुग्ण स्वतः बासुरी वाजवत आहे आणि दुसऱ्या बाजूला रुग्णावर मेंदूची जटील अशी मेंदूची शस्त्रक्रिया पार पाडली जात आहे असे दृश्य सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या संस्कार विभागात पाहायला मिळाले. ज्या रुग्णांच्या मेंदूतील संवेदनशील अशा भाषेच्या अथवा नियंत्रण भागात जर गाठ असेल तर रुग्णाची बोलण्याची अथवा नियंत्रक शक्ती नष्ट होवू शकते. अशा वेळी रुग्णाची शस्त्रक्रिया करत असताना रुग्णास जागे ठेवणे अत्यंत गरजेचे असते. जागा असणाऱ्या रुग्णावर शस्त्रक्रिया करणे हि जोखमीची गोष्ट असली तरी रुग्णाच्या दुष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असते. या रुग्णाच्या बाबतीत रुग्णाची बासुरी वाजवण्याची क्षमता नष्ट होऊ नये, यासाठी सिद्धगिरी हॉस्पिटलच्या डॉ. शिवशंकर मरजक्के व त्यांच्या टीमने रुग्णास बासुरी वाजवायला सांगून दुसऱ्या बाजूने शस्त्रक्रिया यशस्वी केली आहे. अशा प्रकारच्या सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर येथे तब्बल १०२ रुग्णांच्या मेंदूच्या अत्यंत जटील व जोखमीच्या समजल्या जाणाऱ्या अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या आहेत. मेंदूच्या अशा शस्त्रक्रिया करणारे ग्रामीण भागातील पहिलेच आणि भारतातील मोजक्या रुग्णालयापैकी एक रुग्णालय म्हणून सिद्धगिरी हॉस्पिटलने वैद्यकीय सेवेच्या क्षेत्रात मानाचा तुरा रोवला आहे. अशा मेंदूच्या आजाराने ग्रस्त अनेक रुग्णांना मुंबई, दिल्ली सारख्या मेट्रो शहरात जाण्याऐवजी कणेरी मठ येथे उपचार मिळू शकतात, तरी रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक व सुप्रसिद्ध न्युरो सर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी केले. काडसिद्धेश्वर स्वामीजींच्या ‘निराधारांना आधार’ या तत्वावर गेल्या एक तपाहून अधिक काळ रुग्णसेवेत समर्पित असणाऱ्या ‘सिद्धगिरी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर’ ने पश्चिम महाराष्ट्रातील एन.ए.बी.एच. मानांकित धर्मादाय श्रेणीतील अग्रेसर ‘सेवाभावी मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल’ अशी ओळख निर्माण केली आहे. या सेवा शृंखलेत रुग्णालयातील संस्कार (मेंदू विभाग) विभागाने मेंदूच्या तब्बल १०२ अवेक क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया करून एक विक्रम स्थापित केला आहे.
मानवी शरीरात मेंदू सर्व शरीरावर नियंत्रण ठेवण्याचे महत्वाचे काम करत असतो. यासाठी शरीरातून विविध धमनी (शीर) यांच्या मार्फत मेंदूचे सर्व शरीरनियंत्रण कार्य होत असते.बोलणे, ऐकणे, चालणे, प्रतिसाद देणे, बघणे अशा अनेक क्रिया मेंदूच्या संवेदनेतून होत असतात. जर मेंदूमध्ये एखादी गाठ झालेला रुग्ण आला तर त्याच्या सर्व क्रिया पूर्वीसारख्या होण्यासाठी मेंदूच्या संवेदनशील भागाला स्पर्श न करता ती गाठ काढली तरच ती शस्त्रक्रिया यशस्वी होते.
सिद्धगिरी सारख्या ग्रामीण भागात अशा शस्त्रक्रिया उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण सर्व प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीनी हि माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवावी जेणेकरून गरजू रुग्णांना याचा लाभ व्हावा, असे आवाहन पुज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजींनी यावेळी केले.
यावेळी डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी विविध दृक-श्राव्य (व्हिडीओ) माध्यमांच्या द्वारे सदर जटील व जोखमीची शस्त्रक्रिया कशी केली जाते हे उपस्थित पत्रकारांना दाखवून माहिती विशद केली. यावेळी प्रास्ताविक विवेक सिद्ध यांनी केले तर या पत्रकार परिषदेस सिद्धगिरी हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक व न्युरो भूलतज्ञ डॉ. प्रकाश भरमगौडर, राजेंद्र शिंदे, कुमार चव्हाण, ऋतुराज भोसले , दयानंद डोंगरे उपस्थित होते.