धुंद मनाचे-नव्या दमाचे, नवीन आले-वर्ष सुखाचे ! अक्षरदालनमध्ये रंगली काव्यमैफल
schedule01 Jan 25 person by visibility 75 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘धुंद मनाचे, नव्या दमाचे, नवीन आले, वर्ष सुखाचे’ अशा शब्दात भावना व्यक्त करत अनेक कवी आणि कवियित्रींनी ३१ डिसेंबरची संध्याकाळ श्रवणीय केली.
निमित्त होते ‘अक्षर दालन’ आणि ‘निर्धार प्रतिष्ठान’ यांच्यावतीने आयोजित काव्यमैफलीचे. यामध्ये २५ हून अधिक जणांनी वैविध्यपूर्ण विषयांवरील कवितांचे सादरीकरण केले. गेली काही वर्षे ‘काव्यवाचन आणि दुग्ध प्राशन’ ही संकल्पना घेवून या काव्यमैफलीचे आयोजन करण्यात येते. कवी अशोक भोईटे, प्रा. मानसी दिवेकर आणि रजनी हिरळीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
‘सांगतो सर्वांस मी, माणूस माझी जात आहे
धर्म माझा ठेवला मी चौकटीच्या आत आहे’ अशी सामाजिक भावना व्यक्त करणारी कविता एकीकडे उपस्थितांना अंर्तमुख करत असताना
‘द्रौपदी तूच तलवार घे हाती, या कलियुगात कृष्ण येणार नाही’ असे विदारक वास्तव दर्शवणारी कविताही यावेळी सादर झाली. ‘बहर असावा आयुष्याला बारा महिने, हवा कशाला ऋतु वगैरे फुलण्यासाठी’ अशी विचारणाही यावेळी करण्यात आली. प्रेम, विरह, गावावरचे प्रेम, निसर्ग या विषयावरील कवितांचे सादरीकरण करण्यात आले. अगदी रंकाळ्याच्या वास्तवापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणाऱ्या कवितांचाही समावेश होता.