Maharashtra News 1
Register

जाहिरात

 

 महिला प्रकाशकांच्या कार्यावर आधारित ‘गुटेनबर्गच्या सावल्या’ पुस्तकाचे प्रकाशन

schedule04 Jan 25 person by visibility 50 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मानवी समाजातल्या धर्मांमध्ये स्त्रियांप्रती भेदभाव केला आहे. त्यांना दुय्यम स्थान देऊन कमी लेखले आहे.पण ग्रंथानी त्यांना समानतेचा, माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला आहे. जागतिकीकरणाच्या प्रवाहात हे अधिकार अधिक विस्तारत गेले. स्त्रिया शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आल्याने समाजाची पर्यायाने देशाची सर्वांगीण प्रगती होत आहे. आज ज्ञानाला अधिक महत्व प्राप्त झाल असून स्त्रियांनी ज्ञानार्जन केल्यास त्यांचे भविष्य आश्वासक असेल, असे मत माजी कुलगुरू माणिकराव साळुंखे यांनी व्यक्त केले. 

 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत प्रा.डॉ.प्रवीण घोडेस्वार लिखित ‘गुटेनबर्गच्या सावल्या’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.  याप्रसंगी माजी कुलगुरू साळुंखे बोलत होते. ताराराणी विद्यापीठाचे डॉ. क्रांतिकुमार पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागाचे प्रा. डॉ.रणधीर शिंदे, मुक्त विद्यापीठाचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ.आर. व्ही.कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. कमला कॉलेज, कोल्हापूर येथे हा समारंभ झाला.

लेखक प्रा. घोडेस्वार यांनी पुस्तक लेखनामागील भूमिका मांडली.  डॉ. रणधीर शिंदे म्हणाले, ‘लेखकाने निवडलेला विषय अत्यंत वेगळा आहे. प्रकाशक म्हणून सांस्कृतिक क्षेत्रात आपली नाममुद्रा उमटविणाऱ्या तेवीस प्रकाशिका यांच्या वाटचालीचा विस्तृत आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. खडतर प्रवास करत कर्तुत्वाचा आलेख उंचावत नेणाऱ्या प्रवासाची नोंद या पुस्तकात आहे.’ अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ.  पाटील म्हणाले, सावित्रीबाई फुले यांना स्त्री शिक्षणासाठी खूप त्रास झाला पण आज अनेक सावित्रीच्या लेकी आपला ठसा प्रत्येक क्षेत्रात उमटवत आहेत. डॉ . सुजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले.  भाग्यश्री पाटील-कासोटे यांनी आभार  मानले. 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
themes