जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागात गोंधळ, चौकशी अहवालावरुन तक्रारदारांची आरडाओरड
schedule04 Jan 25 person by visibility 77 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील तळंदगेचे सरपंच संदीप पोळ यांच्या विरोधातील चौकशी अहवालावरुन शुक्रवारी, जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात गोंधळ उडाला. वारंवार मागणी करुनही चौकशी अहवाल दिला जात नसल्याचा आरोप करत तक्रारदारांनी ग्रामपंचायत विभागात आरडाओरड केली. मोठयाने आरडाओरड, पळापळ यामुळे मुख्यालयात काही वेळ गाोंधळाची स्थिती होती. सरपंच पोळ व ग्रामसेवक पी एस कांबळे यांनी संगनमताने चाळीस लाख रुपयांचा अपहार केल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे.
या अपहारासंबंधी सनतकुमार भोजकर, धैर्यशील चौगुले, धनाजी पोळ, सागर मेटकर आदींनी तक्रार केली होती. चाळीस लाखाचा अपहाराचे प्रकरण व दुसऱ्या तक्रारीत एका सभेला ग्रामपंचायतीच्या लिपिकाला सचिव म्हणून नियुक्त करुन आठ लाख रुपयांचे धनादेश काढले असल्याचे तक्रारदारांचे लेखी म्हणणे आहे. या दोन्ही प्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाकडून दोन चौकशी अहवाल तयार आहेत. पहिल्या अहवालामध्ये अपहार प्रकरणी सरपंच व दोषींवर कारवाई व्हावी असा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सारद झाला आहे. तर दुसऱ्या प्रकरणात कारवाई करु नये असे अहवालर विभागीय आयुक्तांना सादर करण्यात आला आहे.
दुसऱ्या प्रकरणाच्या चौकशी अहवालाची प्रत तक्रारदार जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाकडे मागत होते. मात्र विभागाकडून तो अहवाल देण्यास टाळाटाळ सुरू आहे. यावरुन शुक्रवारी, तक्रारदार जिल्हा परिषदेत आले. ग्रामपंचायत विभागातील कर्मचाऱ्यांशी वाद झाला. हुज्जत घालण्याचा प्रकार घडला. दुसरीकडे, तक्रारदार हे ग्रामंचायत विभागातील महिला कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे बोलत होते असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. वाद वाढत जाऊन आरडाओरड, पळापळ असा प्रकार घडला. हा प्रकार घडल्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव हे कार्यालयात दाखल झाले. घडल्या प्रकाराची त्यांनी माहिती घेतली. कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली. दुसरीकडे चौकशी अहवालाची प्रत मिळत नाही तोपर्यंत कार्यालय सोडणार नाही असा पवित्रा तक्रारदारांनी घेतला. त्यांना, उशिरा चौकशी अहवालाची प्रत मिळाली. त्यानंतर ते कार्यालयातून बाहेर पडले.