कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे पुरस्कार जाहीर, नऊ जानेवारीला वितरण समारंभ
schedule03 Jan 25 person by visibility 97 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्ह्यातील व्यापारी, उद्योजक व व्यावसायिकांची प्रातिनिधीक शिखर संघटना असलेल्या कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजतर्फे दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. २०२४ या वर्षाकरीता पुरस्कार निवड समितीने निवडलेल्या उद्योग व व्यापार क्षेत्रातील नामवंताना पुरस्कार प्रदान केले जाणार असल्याची माहिती कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवाजीराव देसाई विशेष सेवा पुरस्कार रायसन्स ग्रुपचे भानुदास गोविंद रायबागे यांना जाहीर झाला आहे. परशराम उर्फ बापूसाहेब जाधव उद्योग पुरस्कार हा न्यू मेल्टिंग सेंटर प्रायव्हेट लिमिटेडचे मुबारक गौसलाझम शेख यांना, कै. वर्धीभाई परीख व्यापार पुरस्कार हा अन्नपूर्णा स्पाइसेस प्रायव्हेट लिमिटेडच्या शकुंतला बाबुराव बनछोडे यांना, कै. आमदार चंद्रकांत जाधव नव व्यापार–उद्योग पुरस्कार हा सीमाज मोहक फूडसच्या सीमा संजय जोशी व पोरे ग्रुपचे संदीप सुधाकर पोरे यांना जाहीर झाला आहे.
पुरस्कार वितरण समारंभ गुरुवारी (९ जानेवारी २०२५) दुपारी चार वाजता, गोविंदराव टेंबे रंगमंदिर, गायन समाज देवल क्लब, खासबाग येथे आयोजित केला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेडचे अध्यक्ष दीपेन आगरवाल तर चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेड, मुंबई येथील चेरमन मोहन गुरनानी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी ते ‘व्यापार, उद्योगावरील आव्हाने- संधी व संघटनेचे महत्व’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
पुरस्कार वितरण सोहळयाला माजी आमदार जयश्री जाधव, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी, दि ऑल इंडिया कन्झ्युमर प्रोडक्ट डिस्ट्रीब्युटर्स फेडरेशनचे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पुरस्काराचे यंदाचे सहावे वर्ष आहे. पत्रकार परिषदेस कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष धनंजय दुग्गे, माजी अध्यक्ष आनंद माने, मानद सचिव जयेश ओसवाल, वैभव सावर्डेकर, प्रशांत शिंदे, अजित कोठारी, खजिनदार राहुल नष्टे, संचालक संपत पाटील आदी उपस्थित होते.