चित्रकार एस निंबाळकर यांचे निधन
schedule14 Nov 24 person by visibility 93 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : येथील सुप्रसिद्ध चित्रकार सूर्यकांत निंबाळकर (वय ७१) यांचे बुधवारी रात्री निधन झाले. ते एस. निंबाळकर या नावाने प्रसिध्द होते. मिरज येथे जन्मलेले निंबाळकर यांनी कोल्हापूरातील कलानिकेतन येथून जीडी आर्टची पदविका संपादन केली होती. चित्रकलेत त्यांनी स्वत:ची शैली निर्माण केली आहे. उत्तम कलावंत म्हणून त्यांनी ओळख मिळविली.
निंबाळकर यांचा जलरंगातील निसर्ग चित्र प्रकारात विशेष हातखंडा होता. त्यांनी काढलेली निसर्ग चित्रे, देवदेवतांची चित्रे तसेच भेटकार्डे जगभर प्रसिद्ध आहेत. ज्येष्ठ शिल्पकार आणि चित्रकार रविंद्र मेस्त्री आणि चंद्रकांत मांडरे यांना ते आपले गुरु मानत. रंग, आकार, मांडणीतील साधेपणा यामुळे तसेच आकारमूल्यांचे सहज सुलभीकरण यामुळे त्यांची चित्रे रसिकप्रिय ठरली. चेन्नई, दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळूरु यासह अनेक ठिकाणी त्यांच्या ५० हून अधिक चित्रांचे प्रदर्शन भरलेले आहे. त्यांच्या कलाकृती लंडन, स्पेन, न्यूयॉर्क या देशासह देशविदेशातील कलारसिक आणि संग्रहालयात संग्रही आहेत. कॅम्लिन, ओक, बॉम्बे आर्ट ऑफ सोसायटीकडून त्यांना पारितोषिके मिळालेली आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातंवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी सकाळी नऊ वाजता पंचगंगा स्मशान भूमी येथे आहे.