कोल्हापूर दक्षिणमध्ये होणार शासन आपल्या दारी उपक्रम
schedule25 Jun 23 person by visibility 995 categoryराजकीय

अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर:
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील 'शासन आपल्या दारी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात होणार आहे. माजी आमदार अमल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर भाजपच्यावतीने आयोजन केले आहे.
राज्यातील जनतेला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा आणि त्यांचे जीवन अधिक सुखकर व्हावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवून ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम सरकारने आयोजित केला आहे. या अभियानाद्वारे नागरिकांना एकाच छताखाली जलदगतीने विविध योजनांचा लाभ देण्यात येत आहे. यामुळे अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात ७५ हजार उद्दिष्टांच्या दुप्पट म्हणजे १ लाख ५८ हजार लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला होता.
याच धर्तीवर भाजपा कोल्हापूरच्यावतीने लवकरच कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये शासन आपल्या दारी या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे. यामध्ये शासकीय दाखले देखील उपलब्ध करून देण्यात येतील.
दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये ग्रामीण भागातील पाच जिल्हा परिषद गट व शहरातील प्रभागांनुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. लवकरच याचे विभागवार वेळापत्रक जाहीर करून सविस्तर माहिती प्रसिद्धीस देण्यात येईल, तेव्हा या कार्यक्रमामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे व या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असं आवाहन अमल महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिणमधील सर्व नागरिकांना केले आहे.