शरद पवारांकडून केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी, उभारणीसाठी एक कोटीची मदत
schedule03 Sep 24 person by visibility 279 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी, मंगळवारी (३ सप्टेंबर) संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची पाहणी केली. या नाट्यगृहाच्या उभारणीसाठी त्यांनी एक कोटी रुपयांची मदत जाहीर केली. राज्यसभा खासदार फंडातून त्यांनी ही मदत दिली आहे. दोन दिवसात एक कोटी रुपयांच्या धनादेश पाठवून देतो असेही त्यांनी सांगितले.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे गेल्या महिन्यात आठ ऑगस्ट रोजी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. संपूर्ण नाट्यगृह जळून खाक झाले. हे नाट्यगृह पूर्ववत उभे करावे अशी कलाप्रेमी व नागरिकांची मागणी केली आहे. राज्य सरकारकडून वीस कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली आहे. लोकप्रतिनिधींनीही मदतीची घोषणा केली आहे. पवार यांनी, मंगळवारी नाट्यगृहाची पाहणी केली. ‘राजर्षी शाहू महाराजांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या या नाट्यगृहाने अनेक दिग्गज कलावंत रसिक प्रेक्षकांसमोर आणले. दुर्दैव असं की ९ ऑगस्टला केशवराव भोसले यांची जयंती असते त्याच्या पूर्वसंध्येला हे नाट्यगृह आगीत भस्मसात झाले, ही बाब मनाला प्रचंड वेदना देणारी आहे. लवकरच हे नाट्यगृह पूर्ववत सुरू होऊन कलावंत आणि नाट्यरसिकांची याठिकाणी पुन्हा मांदियाळी बघता यावी, अशी अपेक्षा आहे.’असे ते म्हणाले.’ महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी नाट्यगृहाच्या उभारणीसंदर्भातील माहिती दिली.
यावेळी आमदार सतेज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, जिल्हा मधयवर्ती बँकेचे संचालक ए. वाय. पाटील, शहराध्यक्ष आर. के. पोवार, अभिनेता आनंद काळे, अतिरिक्त् आयुक्त् राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत आदी उपस्थित होते.