महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘शिवाजी पेठ सोबत असली की लढायला दहा हत्तीचे बळ मिळते. या पेठेत माझे बालपण गेले, अनेक जिवलग सवंगडे मिळाले. येथील बळावर माझा विजय निश्चित आहे. कारण जे शिवाजी पेठेत होते, तेच जिल्ह्यात घडते.’ असा विश्वास महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार प्रा. संजय मंडलिक यांनी व्यक्त केला.
शिवाजी पेठ येथील शिवाजी मंदिर येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय मडलिक म्हणाले, ‘खासदार म्हणून शिवाजी पेठेत एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी ८० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. रंकाळा आणि गांधी मैदानााच्या संवर्धनाचे काम सुरू आहे. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. ‘
भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव महेश जाधव यांनी थेट पाइपलाइनची अपुरी कामे, शहराची रखडलेली हद्दवाढ, खराब रस्ते या विषयाला काँग्रेसचे तत्कालिन पालकमंत्री जबाबदार असल्याचा आरोप केला. भारतीय जनता पक्षाच्या सरकारने ४६८ कोटी रुपये देऊन कोल्हापूर टोलमुक्त केले. खासदार मंडलिक यांनी प्रत्येक गावाला निधी दिला. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळवून दिला. यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे. याउलट काँग्रेसकडे स्वतचा उमेदवार नाही. काँग्रेसने शाहू महाराजांना बिनविरोध राज्यभेत का पाठविले नाही ? भाजपने संभाजीराजे यांना राज्यसभा खासदार करुन सन्मान केला होता.’
मेळाव्याला माजी महापौर बाजीराव चव्हाण, माजी नगरसेवक महेश सावंत, उत्तम कोराणे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवाजी जाधव,तुकाराम इंगवले, अजिंक्य चव्हाण, कुलदीप गायकवाड, सुहास साळोखे, संजय सावंत, गायत्री राऊत, पवित्रा रांगणेकर आदी उपस्थित होते. भाजपचे जिल्हा सरचिटणीस अशोक देसाई यांनी प्रास्ताविक केले. माजी नगरसेवक अजित ठाणेकर यांनी आभार मानले.