कागलमधील भाजपा कार्यकर्त्यांनी माफ करावे - जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील
schedule18 Nov 25 person by visibility 132 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर ‘निवडणुकीची पूर्वतयारी करूनही भारतीय जनता पक्षाच्या कागलमधील कार्यकर्त्यांना नगरपालिका निवडणुकीपासून थांबावे लागते यामुळे कागल मधील सर्व कार्यकर्त्यांना झालेला त्रास त्यांना झालेला यातना याबद्दल पक्षाचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी सर्व कार्यकर्त्याची मनापासून दिलगीरी व्यक्त करतो .कागल शहरातील भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी मोठ्या मनाने आम्हाला माफ करावे.’अशी भावना जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी व्यक्त केली आहे.
पाटील यांनी म्हटले आहे,‘ कागल नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पार्टीने माजी आमदार संजय घाटगे यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदांसह जवळपास पंधरा नगरसेवक पदाच्या उमेदवारांचे अर्ज दाखल केले होते .या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून मित्र पक्षांबरोबर युती करून पूर्ण तयारीनिशी निवडणूक लढवावी , अशी अपेक्षा इथल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेली होती. युती नाही झाली तरी भाजप म्हणून स्वबळावर लढण्याची तयारी भाजपा कार्यकर्त्यांनी केली होती .अशा परिस्थितीमध्ये सोमवारी अचानक भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून भारतीय जनता पार्टीच्या कागल नगरपालिकेतील उमेदवारांनी आपली उमेदवारी अर्ज ए .बी .फॉर्मसह दाखल करू नयेत , असा आदेश आला होता . हा आदेश प्रमाण म्हणून कागल मधल्या माजी आमदार संजयबाबा घाटगे आणि भाजपच्या सर्व निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपले उमेदवारी अर्ज ए .बी . फार्म उपलब्ध असतानाही अर्ज दाखल केले नाहीत . खरे तर या निर्णयाने कागल मधील भाजपाचे कार्यकर्ते प्रचंड नाराज झालेले आहेत. त्यांची नाराजी भाजपचा जिल्हाध्यक्ष या नात्याने मी समजू शकतो. पण पक्षाच्या शिस्तीप्रमाणे कागल मधल्या या सर्व निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्त्यांनी पक्षाची शिस्त प्रमाण म्हणून आलेल्या आदेशाचे प्रामाणिकपणे पालन केले एक कार्यकर्ता म्हणून या कागल मधील सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानावे तेवढे थोडेच आहेत .
भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वने पक्षाचे उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा घेतलेला निर्णय हा पूर्ण विचारांतीच घेतलेला असेल याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही .पण निवडणूक लढवण्याची पूर्वतयारी करून कागल मधील कार्यकर्त्यांना यापासून वंचित रहावे लागते यासारखे कार्यकर्त्यांच्या दृष्टीने मोठे दुर्दैव नाही.’