हिस्ट्री रिपीटस अगेन ! नेत्यांचे गळयात गळे – कार्यकर्ते एकमेकांच्या जीवावर !!
schedule18 Nov 25 person by visibility 117 category
आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू आणि मित्र नसतो म्हणतात. राजकीय परिस्थिती आणि संधी यावर सारं काही अवलंबून असते. तत्वनिष्ठ आणि पक्षीय राजकारण तर आता कोसो दूर मागे राहिले आहे. कागलसारख्या गटातटात विखुरलेल्या तालुक्यात तर कोण कधी कोणासोबत युती करेल आणि निवडणूक लढवेल हे सारं अनाकलनीय. मंत्री हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे यांच्या अनपेक्षित अशा नव्या राजकीय युतीमुळे सारेच जण बुचकळयात पडले. कार्यकर्त्यांना तर हा मोठा धक्का ठरला आहे. कारण कालपर्यंत ज्यांच्या विरोधात रान उठवत होते, आजपासून त्यांचा जयघोष करायचं हे अनेकांना जड जात आहे.मात्र नेत्यांचा आदेश मानून आता दोन्हीकडचे कार्यकर्ते एका सुरात ‘हसन मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे’ यांच्या विजयाच्या घोषणा देत आहेत. मात्र कागलमध्ये अशा आघाडी आणि युती हा काही नवा प्रकार नाही. पहिल्यांदाच अशी आघाडी झाली नाही. कागल नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं यंदा, ‘इतिहासाची पुनरावर्ती’झाली... हिस्ट्री रिपीटस अगेन !
सध्या कागलचे राजकारण हे मंत्री हसन मुश्रीफ, माजी खासदार संजय मंडलिक, शाहू ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाटगे आणि माजी आमदार संजय घाटगे हे चौघांभोवती फिरते. वास्तविक चौघेही वेगवेगळया पक्षात. वास्तविक, पक्ष नावालाच या मतदारसंघात गटातटाची ओळख अधिक. यामुळे राज्य आणि जिल्हा पातळीवर पक्षीय राजकारण असलं तरी कागलमध्ये मात्र गटच प्रभावी. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत मंत्री मुश्रीफ आणि समरजितसिंह घाटगे यांच्यातील राजकीय वैर जिल्ह्यांनी अनुभवले. एकमेकांवर कुरघोडी, शह काटशह देण्यात दोघांनी एकही संधी दवडली नाही. नोव्हेंबर २०२४ मधील निवडणुकीत मंत्री मुश्रीफ हे महायुतीचे उमेदवार ठरले आणि समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करत हाती घडयाळ बांधले. या निवडणुकीत मुश्रीफ यांनी बाजी मारली. मुश्रीफ हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षात आहेत. मात्र तालुक्यात राष्ट्रवादीपेक्षा मुश्रीफ गटच अधिक प्रभावी. निवडणुकींतर घाटगे यांना राष्ट्रवादी शरद पवार पक्षांशी फार संबंध राहिला नाही. ते एकदोनदा पक्षाच्या व्यासपीठावर दिसले. बाकी कागलात घाटगे गटच म्हणून सक्रिय. आता दोघे एकत्र.
‘तालुक्याच्या आणि जनतेच्या विकासासाठी आमची युती’अशी हाकाटी पिटत सोयीचे राजकारण करण्यात सारेच जण माहीर. टोकाचा संघर्ष होऊनही नेते मंडळींनी झाले गेले विसरुन एकत्र आल्याची उदाहरणे आहेत. कागल तालुक्यात इतिहासाची पुनरावर्ती वारंवार झाली आहे. कै. शामराव भिवाजी पाटील व माजी खासदार सदाशिवराव मंडलिक, माजी खासदार सदाशिवराव मंडलिक व शाहू कारखान्याचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे, मंत्री हसन मुश्रीफ व माजी आमदार संजय घाटगे यांच्यामध्ये राजकीय संघर्षही झाला. आणि सोयीनुसार ज्या त्या काळात राजकीय आघाडयाही झाल्या. मात्र या मंडळींचा राजकीय वैरही कमालीचा होता. सदाशिवराव मंडलिक व विक्रमसिंह घाटगे यांच्यातील राजकीय लढाईला राजा विरुद्ध प्रजा असे रंगविले गेले. माजी खासदार सदाशिवराव मंडलिक आणि मंत्री मुश्रीफ यांची जोडी तर ‘सदा- हसन’म्हणून ओळखली जायची. कालांतराने त्या दोघांत वितुष्ठ झाले. त्यांच्यामध्ये दरी निर्माण झाल्यानंतर कागलमधील राजकीय संघर्ष टोकाला पोहोचला होता. टीका करताना वापरलेले शेलके शब्द, एकमेकांना दिलेली उपमा ही राजकीय विखार कोणत्या थरापर्यंत पोहोचतो याचे दर्शन घडविणारे होते. क
कालांतराने कागलमध्ये नवीन समीकरणे साकारत गेली. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांच्या विजयात मुश्रीफ यांचे पाठबळही उपयुक्त ठरले. तेव्हा मुश्रीफ यांची यंत्रणा राष्ट्रवादी पक्षाच्या उमेदवारांपेक्षा मंडलिक यांच्या विजयासाठी अधिक झटली असे आक्षेपही नोंदविले. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर कागलात संजय मंडलिक, हसन मुश्रीफ व संजय घाटगे एकत्र दिसत होते. दरम्यान गोकुळच्या गत निवडणुकीचा निकाल व २०२४ मधील लोकसभा निवडणुकीनंतर मंत्री मुश्रीफ व संजय मंडलिक यांच्यात फार सख्य राहिले नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतही मंडलिक व मुश्रीफ आमनेसामने उभे ठाकले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत संजय मंडलिक यांनी मंत्री मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांना उद्देशून हे दोघे जिल्ह्याच्या राजकारणातील अदानी अंबानी आहेत असे वक्तव्य करत खळबळ उडवून दिली होती.
गेले काही वर्षे कागलमध्ये मंत्री मुश्रीफ आणि माजी आमदार संजय घाटगे व त्यांच्या विरोधात समरजितिसंह घाटगे व संजय मंडलिक असे चित्र दिसत होते. संजय मंडलिकांचे पुत्र वीरेंद्र मंडलिक यांचा जिल्हा परिषद व गोकुळमधील पराभव हा मंडलिक गटाच्या जिव्हारी आहे. मुश्रीफ यांच्या विरोधात मंडलिक व समरजितसिंह घाटगे गट एकवटत असताना कागल नगरपालिकेच्या निवडणुकीत अनपेक्षित अशी आघाडी झाली. कट्टर विरोधक असलेले मुश्रीफ व समरजित एकत्र आले. या आघाडीत अद्याप मुश्रीफ यांचे मित्र माजी आमदार संजय घाटगे दिसत नाहीत. शिवाय मुश्रीफ व घाटगे गटातील कार्यकर्त्यांना सध्यस्थितीत मैत्रीचे गुणगान गायला जड जात आहे. कागलात रुसवे - फुसवे निर्माण होत आहेत. मात्र ‘कसं नेते म्हणतील तसं’अशी राजकीय धारणा कागलात असल्याने ही नवी आघाडीही कार्यकर्त्यांच्या पचनी पडेल. दरम्यान राजकीय नेते मंडळीसाठी वाटेल ते किंमत मोजायची तयारी ठेवणाऱ्या, एकमेकांच्या जीवावर उठणाऱ्या कार्यकर्त्यांना कागलच्या राजकारणातील नवा राजकीय दोस्ताना बोध घ्यावा असा आहे.