लिंगायत माळी समाजाच्या सांस्कृतिक केंद्र-वसतिगृह बांधकामासाठी भरीव मदत करणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर
schedule31 Oct 26 person by visibility 87 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: ‘लिंगायत माळी समाजाने समाजाभिमुख उपक्रम राबवित कोल्हापूर जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजाने संघटित होऊन आता सांस्कृतिक केंद्र व वसतिगृह उभारणीचे काम हाती घेतले आहे. लिंगायत माळी समाजाच्या सांस्कृतिक केंद्र व वसतिगृह बांधकामासाठी भरीव मदत करू’ अशी ग्वाही पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
लिंगायत माळी समाज, कोल्हापूर जिल्हातर्फे उजळाईवाडी येथे ‘कै. नारायण तुकाराम माळी सांस्कृतिक केंद्र व वसतिगृह’ इमारतीचा पायाभरणी समारंभ शनिवारी (३१ ऑक्टोबर २०२६) आयोजित केला होता. आमदार अशोक माने, शिवसेनेचे जिल्हा समन्यवक सत्यजीत कदम, जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, सानिका आवाडे, इचलकरंजीतील नगरसेविका पूनम माळी, पंचायत समिती सदस्य डॉ. शिल्पा हजारे, उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, लिंगायत माळी समाजाचे अध्यक्ष गुरुबाळ माळी, उपाध्यक्ष अनिल माळी, वीरशैव बँकेचे अध्यक्ष सतीश घाळी, कोल्हापूर वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष राहुल नष्टे, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा समारंभ दिमाखात पार पडला. या पायाभरणी समारंभासाठी समाज बांधवानी मोठया संख्येने गर्दी केली होती. पायाभरणी समारंभात समाजातील मान्यवरांनी पाच लाख रुपयांहून अधिक रक्कम बांधकामासाठी घोषित केली. त्या साऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सांस्कृतिक केंद्र व वसतिगृह बांधकामासाठी अंदाजित खर्च ७५ लाख रुपये आहे.
आमदार अशोक माने यांनी ‘जो समाज संघटित असतो, तोच समाज मोठा होतो. लिंगायत माळी समाज हा जिल्हाभर आहे. संघटित होत सामाजिक, शैक्षणिक उपक्रम आयोजित करुन वेगळेपण दाखविले आहे. या समाजाच्या सांस्कृतिक केंद्र व वसतिगृह उभारणीसाठी एक लाख रुपयांची देणगी देत आहे.’ शिवसेनेचे जिल्हा समन्यवक सत्यजीत कदम यांनी, ‘लिंगायत समाजाच्या कार्याला आपले नेहमी सहकार्य आहे. सांस्कृतिक केंद्र व वसतिगृह बांधकामासाठी दोन ट्रक सिमेंट पोती देऊ. येत्या वर्षभरात इमारतीचे बांधकाम पूर्ण होईल या पद्धतीने नियोजन करावे. इमारत बांधकामासाठी आपले सहकार्य राहील.' असे सांगितले. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील, सानिका आवाडे, सरपंच आंबवडे, डॉ. संदीप हजारे यांनीही बांधकामासाठी मदतीची ग्वाही दिली.
लिंगायत माळी समाज कोल्हापूर जिल्ह्याचे अध्यक्ष गुरुबाळ माळी यांनी समाजातर्फे राबविण्यात येत असलेल्या कार्याची माहिती दिली. ‘कोल्हापुरात कै. नारायण माळी सांस्कृतिक केंद्र व वसतिगृह उभारणी हे समाजाचे स्वप्न आहे. या बांधकामासाठी आतापर्यंत जवळपास तीस लाख रुपये जमा झाले आहेत. समाजातील दानशूर व्यक्ती बांधकामाला विविध माध्यमातून मदत केली आहे. सांस्कृतिक केंद्र व वसतिगृह उभारणीसाठी समाजबांधवांनी सढळ हातांनी मदत करावी.’याप्रसंगी समाजाचे मार्गदर्शक सीतारामबापू चौगुले, इंजिनीअर अण्णासाहेब माळी, प्राचार्य जी. पी. माळी, रेंदाळ माळी समाज संघटनेचे अध्यक्ष एम. बी. माळी यांनी मार्गदर्शन केले. शिक्षक संतोष माळी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला नगरसेवक वैभव माने, स्वरुप कदम, कारखानदार प्रभाकर कुलगुडे, राजेंद्र माळी, गोरख माळी, वीरशैव बँकेचे संचालक राजेंद्र माळी, महिला आघाडीच्या वंदना माळी, विद्या माळी, इचलकरंजी लिंगायत माळी समाजाचे अध्यक्ष रमेश माळी, सदाशिव बुभणे आदी उपस्थित होते. संघटनेचे संचालक संतोष माळी यांनी आभार मानले.