Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ई-चलन संदर्भातील मागण्यांवर सरकार सकारात्मक, वाहतूकदारांना न्याय देण्यासाठी कार्यवाही - प्रताप सरनाईकउल्का महाजन, चिन्मयी सुमीत, प्रतिभा खैरनार, नितीन कोत्तापल्ले यांना दमसा सभेचे पुरस्कारहद्दवाढीवरुन महापालिका सभा तहकूब, गांधीनगरातील अतिक्रमण हटविण्यासाठी सभागृह आक्रमक चारचाकी वाहन सारले बाजूला…नगरसेवक सवार झाले इलेक्ट्रिक बाईक, सायकलवर !कृष्णराज महाडिक यांचा बार्शी - सोलापूर एसटी प्रवासप्रा. सुधाकर मानकर यांच्या शोकसभेचे बुधवारी कोल्हापुरात आयोजन  सोलापूरचा महेंद्र गायकवाड ठरला हिंदकेसरी, पुण्याचा पृथ्वीराज मोहोळला उपविजेतेपदशिवसेना ठाकरे पक्षातर्फे मोदी सरकारच्या विरोधात विडंबनात्मक आंदोलनडीवाय पाटील पॉलिटेक्निक, तळसंदेच्या 132 विद्यार्थ्यांची विविध कंपनीमध्ये निवड फुटबॉलच्या मैदानातही नगरसेवकच ठरले भारी, अधिकारी संघावर ३-२ गोलफरकांनी विजय

जाहिरात

 

उल्का महाजन, चिन्मयी सुमीत, प्रतिभा खैरनार, नितीन कोत्तापल्ले यांना दमसा सभेचे पुरस्कार

schedule19 May 26 person by visibility 23 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने देण्यात येणारे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाले असून सावित्रीमाई पुरस्कारासाठी सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, कोयनामाई पुरस्कारासाठी अभिनेत्री चिन्मयी सुमीत, जनाबाई पुरस्कारासाठी प्रतिभा खैरनार तर वि. स. खांडेकर पुरस्कारासाठी नितीन कोत्तापल्ले यांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी २५ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे पुरस्कारांचे स्वरुप असून येत्या २४ मे 2026 रोजी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या हस्ते कोल्हापुरात पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे.

पाटण (सातारा) येथील कवयित्री प्रा. डॉ. रामकली पावसकर यांनी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेकडे ठेवलेल्या निधीतून हे पुरस्कार देण्यात येतात. त्यांचे वडिल प्रा. मनोहर कोपर्डे यांच्या स्मरणार्थ वि. स. खांडेकर यांच्या नावाने पुरस्कार देण्यात येतो. कादंबरी, कथा, ललित आणि आत्मचरित्र यापैकी कोणत्याही वाड्.मयप्रकारातील त्या वर्षीच्या उत्कृष्ट पुस्तकास हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा या पुरस्कारासाठी कोत्तापल्ले (पुणे) यांच्या 'गुरुः एका योगियाचे तुरीयातीत स्वप्न' या कादंबरीची निवड करण्यात आली. प्रख्यात कादंबरीकार आणि समीक्षक प्राचार्य डॉ. महेंद्र कदम यांच्या यांच्या निवड समितीने ही निवड केली. यापूर्वी हा पुरस्कार संग्राम गायकवाड यांना `मनसमझावन` कादंबरीसाठी तर अमोल पालेकर यांना 'ऐवज-एक स्मृतिबंध' या आत्मचरित्रासाठी देण्यात आला होता.

डॉ. पावसकर यांच्यावतीने आई कमल मनोहर कोपर्डे यांच्या स्मरणार्थ कवयित्रीसाठी जनाबाई पुरस्कार दिला जातो. त्यासाठी प्रतिभा खैरनार ( नांदगाव, नाशिक) यांच्या `वंशावळीच्या प्राचीन सरीतून` या कवितासंग्रहाची निवड करण्यात आली. त्यासाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ कवयित्री प्रा. डॉ. प्रज्ञा दया पवार आणि विजय चोरमारे यांनी काम पाहिले. गतवर्षी हा पुरस्कार प्रज्ञा दया पवार यांच्या 'हिल्लोळ हरवून आतबाहेरचा' या संग्रहासाठी देण्यात आला होता.

सामाजिक क्षेत्रात काम करणा-या कार्यकर्तीसाठी स्त्रीशिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या स्मरणार्थ सावित्रीमाई पुरस्कार देण्यात येतो. त्यासाठी श्रीमती उल्का महाजन यांची निवड करण्यात आली. आदिवासी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या हक्कांसाठी सुमारे साडेतीन दशकांहून अधिक काळ त्या काम करीत असलेल्या कामाची दखल घेऊन संस्थेने त्यांची निवड केली आहे. पर्यावरण रक्षणासाठी काम करणा-या विविध चळवळींमध्येही त्यांचा सहभाग असतो. गतवर्षी हा पुरस्कार शुभदा देशमुख (गडचिरोली) यांना देण्यात आला होता.

कोयनामाई पुरस्कारासाठी निवड करण्यात आलेल्या अभिनेत्री चिन्मयी सुमीत या तीस वर्षांहून अधिक काळ रंगभूमी, चित्रपट तसेच दूरचित्रवाणी मालिकांच्या माध्यमातून मराठी रसिकांना परिचित आहेत. गेल्या काही वर्षात मराठी भाषेसाठी आक्रमकपणे काम करणा-या मराठी अभ्यास केंद्राच्या कामातही त्यांचा सक्रीय सहभाग असतो. गतवर्षी कोयनामाई पुरस्कार अभिनेत्री प्राजक्ता हनमघर यांना प्रदान करण्यात आला होता.
यंदाचा पुरस्कार प्रदान समारंभ रविवारी २४ मे रोजी सकाळी १०.३० वाजता शेठ रामभाई सामाणी सभागृह, शिवाजी उद्यमनगर येथे होणार असल्याची माहिती साहित्य सभेचे कार्यवाह डॉ. विनोद कांबळे यांनी दिली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes