कोल्हापूरच्या धान्य महोत्सवात पहिल्याच दिवशी ५० लाखांहून अधिक उलाढाल
schedule21 Mar 26 person by visibility 21 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : शेतकऱ्यांनी पिकवलेला दर्जेदार शेतीमाल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने कृषी विभागाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक २१ व २२ मार्च २०२६ रोजी 'जिल्हास्तरीय धान्य महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले आहे. हा दोन दिवसीय महोत्सव राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील स्मृती सदन येथे पार पडत आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आज, २१ मार्च रोजी कोल्हापूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी कोल्हापूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. सुनील कराड आणि उपविभागीय कृषी अधिकारी अरुण भिंगारदेवे, किरण पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. महोत्सवाला ग्राहकांनी पहिल्याच दिवशी उदंड प्रतिसाद दिला असून, अवघ्या एका दिवसात तब्बल ५० लाख रुपयांहून अधिक उलाढाल झाली आहे.
या धान्य महोत्सवामध्ये ग्राहकांना शेतकऱ्यांकडून थेट १०० टकके शुद्धतेचे धान्य आणि ओडीओपी व जीआय मानांकन प्राप्त दर्जेदार शेतीमाल खरेदी करण्याची संधी मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूरचा सेंद्रिय गूळ, काकवी, पाटगावचा मध, आजरा घनसाळ आणि विविध प्रकारचे तांदूळ थेट विक्रीसाठी उपलब्ध आहेत. इतर जिल्ह्यांतील प्रसिद्ध शेतीमालही ग्राहकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामध्ये सोलापूरची ज्वारी, साताऱ्यातील 'फळांचे गाव' असलेल्या धुमाळवाडी येथील द्राक्षे, अंजीर, वॉटर ॲपल, कलिंगड, पेरू, डाळिंब, खरबूज, वाईगाव हळद, खपली गहू, पाटगाव मध, देशी अंडी आणि विविध प्रक्रियायुक्त पदार्थांचा समावेश आहे. महोत्सवामध्ये बचत गटांच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले 'रेडी टू सर्व्ह' खाद्यपदार्थ आणि कृषी विभागाच्या विविध प्रकल्पांतर्गत तयार झालेले प्रक्रियायुक्त पदार्थही ग्राहकांना पाहण्यासाठी, खरेदी करण्यासाठी आणि आस्वाद घेण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत.