राहुलच्या माध्यमातून इंगवले कुटुंबीयांचे राजकारण -समाजकारणात नवे पर्व – रविकिरण इंगवले
schedule28 Dec 25 person by visibility 43 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ इंगवले कुटुंबीय म्हणजे विश्वास, लोकांसाठी संघर्ष….प्रा. विष्णूपंत इंगवले यांचा सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालविताना गेल्या वीस पंचवीस वर्षात त्याच पद्धतीने काम केले. नगरसेवक म्हणून मी व माझी पत्नी तेजस्विनी इंगवले यांनी, प्रभागातील विकासकामात तसूभरही कमी पडलो नाही. लोकसंपर्क कधी तुटला नाही. आता महापालिकेच्या निवडणुकीत राहुल इंगवले यांच्या माध्यमातून इंगवले कुटुंबीयांचे राजकारण -समाजकारणात नवे पर्व सुरू होत आहे. आतापर्यंत जशी मला साथ दिली तसाच पाठिंबा या निवडणुकीतही राहू दे.’अशी भावनिक साद शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी मतदारांना घातली.
खरी कॉर्नर येथे आयोजित प्रचार मेळाव्यात ते बोलत होते. शिवसेना ठाकरे पक्षातर्फे प्रभाग क्रमांक दहामधून राहुल इंगवले व प्रभाग क्रमांक चौदामधून छाया किशोर पाटील यांच्या उमेदवारीच्या प्रचारार्थ मेळावा आयोजित केला होता. शहरप्रमुख सुनील मोदी, माजी नगरसेविका तेजस्विनी इंगवले, सचिन मांगले, शिवसेना रिक्षा सेनेचे प्रमुख राजू जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा मेळावा झाला. याप्रसंगी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख व माजी नगरसेवक रविकिरण इंगवले म्हणाले, ‘शिवसेना जिल्हाप्रमुखपदी निवडीच्या कालावधीत माझ्या विरोधात अनेकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्रे पाठविली. माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला. मात्र शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, जिल्हाप्रमुखपद दिले. शिवसेना पक्षप्रमुख ठाकरे हे स्वाभिमानीची लढाई करत आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका आहे. त्याच विचाराने आपण काम करत आहेत. निवडणुकीत मी किंवा माझी पत्नी तेजस्विनी इंगवले या निवडणूक लढविण्यापेक्षा राहुल इंगवले यांना तुमच्यासमोर उभे केले आहे. राहुलच्या माध्यमातून इंगवले कुटुंबीयांचे समाजकारण व राजकारणात नवे पर्व सुरू होत आहे. लोकांची कामे करण्यात राहुल कुठेही कमी पडणार नाही.’
‘समाजकारण व राजकारण करताना मातब्बर लोकांशी मी संघर्ष केला. पण कधी डगमगलो नाही. वीस वर्षापूर्वी विवाहात मिळालेल्या अंगठया विकून निवडणूक लढविली. संघर्षाच्या काळात लोक पाठीशी उभे राहिले. लोकांच्या या बळावरच आताच्या निवडणुकीतही बाजी मारु. दरम्यान मतदान करताना नागरिकांनी एकदा विचार करावा की, महायुतीच्या उमेदवारांचे काय व्यवसया आहेत ? ते कधी लोकांसोबत होते का ? ’ असे आवाहन इंगवले यांनी केले. याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी यांनी भाषण केले. राहुल इंगवले यांनी मनोगत व्यक्त करताना प्रभागातील विकासकामासाठी आपण कुठेही कमी पडणार नाही असे सांगितले.