सुमन रमेश तुलसियानी चॅरिटेबल ट्रस्टचा विद्यार्थीहिताचा उपक्रम ! विवेकानंद संस्थेला तीन शालेय बसेस देणार ! !
schedule28 Dec 25 person by visibility 82 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिक्षण, आरोग्य सेवा व समाजकल्याणसाठी मदतीचा हात देणाऱ्या मुंबई येथील सुमन रमेश तुलसियानी चॅरिटेबल ट्रस्टतर्फे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या तीन शाळांना ६६ लाख रुपये किंमतीच्या तीन विद्यार्थी वाहतूक शालेय बसेस देण्यात येणार आहेत. कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल, सातारा येथील श्री भवानी विद्यामंदिर आणि तासगाव येथील स्वामी रामानंद भारती विद्यालयाकडे या बसेसचा सुपूर्द होणार आहेत. अशी माहिती ट्रस्टचे प्रमुख मनीष रुपाणी, विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, संस्थेचे कोल्हापूर विभागप्रमुख श्रीराम साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ट्रस्टतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील वारुळ येथील कै. सुकुमार गुरुदास नागेशकर हायस्कूल येथे सुसज्ज अशी ‘तुलसियानी कम्प्युटर लॅब’ उभारण्यात आली आहे. यासाठी ट्रस्टतर्फे ११ लाख ५० हजार रुपये प्राप्त झाल्या आहेत. त्या रकमेतून वीस कम्प्युटरची अद्ययावत लॅब तयार झाली आहे. या लॅबचे उद्घाटन व कोल्हापुरातील हायस्कूलला मिळालेल्या बसचा लोकार्पण सोहळा २९ डिसेंबर २०२५ रोजी होत आहे. सांगली व सातारा येथील शाळांना दिलेल्या बसेसचा लोकार्पण सोहळा ३० डिसेंबर २०२५ रोजी होत आहे. समाजसेवक कृष्णाजी महाडिक व ट्रस्टचे प्रमुख रुपाणी यांच्या हस्ते हा कार्यक्रम होत आहे. विवेकानंद शिक्षण संस्थेतर्फे ज्ञानदानाचे काम अतिशय उत्कृष्टपणे सुरू आहे. संस्थेचे शैक्षणिक कार्य, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीची सोय या साऱ्या बाबी विचारात घेऊन ट्रस्टतर्फे मदत करण्यात येत असल्याचे रुपाणी यांनी सांगितले. विवेकानंद शिक्षण संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे यांनी, ट्रस्टतर्फे विवेकानंद शिक्षण संस्थेतील शाळांना शालेय बसच्या स्वरुपात मिळालेली मदत मोठी आहे. ट्रस्टचे सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रातील कार्य मोठे आहे. त्यांच्या मदतीचा निश्चितच गरीब मुलांना उपयोग होईल. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या शिकवणीनुसार संस्थेची वाटचाल सुरू आहे. ’ विवेकानंद शिक्षण संस्थेचे कोल्हापूर विभागप्रमुख श्रीराम साळुंखे म्हणाले, ‘विवेकानंद शिक्षण संस्था उच्चतम दर्जाचे शिक्षण, गुणवंत व संस्कारक्षम विद्यार्थी घडविण्यावर भर देत. ट्रस्टच्या माध्यमातून मिळालेल्या शैक्षणिक मदतीमुळे ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणाला आणखी गती लाभणार आहे.याप्रसंगी सचिन गायकवाड उपस्थित होते.