महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :
राधानगरी तालुक्यातील कसबा वाळवे येथील कालव्यावरील पाणी उपसा करणाऱ्या इलेक्ट्रिक मीटर चोरणाऱ्या तीन संशयितांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. अनिकेत आप्पासो शिंदे (वय १९), शुभम सुनील चौगुले ( वय २६, दोघे रा. निगवे खालसा ता. करवीर) प्रथमेश शहाजी मांडवकर (वय २२ रा. वाळवे खुर्द, ता. कागल) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
कसबा वाळवा येथील कालव्यावरील सहा इलेक्ट्रिकल मोटरी चोरीला गेल्याची फिर्याद मारुती शंकर शिंदे (रा. कसबा वाळवे) यांनी राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली होती. दरम्यान जुना राजवाडा पोलिसांना चोरलेल्या मोटरी विक्रीसाठी तिघेजण कोल्हापुरात येणार आहे अशी माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बुधवारी दुपारी निर्माण चौक ते हॉकी स्टेडियम मार्गावर सापळा रचला.
दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एका टेम्पोतून संशयित तिघेजण आल्याची माहिती पोलिसांना लक्षात आली. पोलीसांनी टेम्पो अडवून तपासणी केली असता त्यांना सहा इलेक्ट्रिकल मोटरी दिसून आल्या. पोलिसांनी त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी कसबा वाळवे येथून मोटारी चोरल्याची कबुली दिली.
पोलिसांनी इलेक्ट्रिक मोटर जप्त करून तिघा संशयितातांचा ताबा राधानगरी ठाण्याकडे दिला. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, हवालदार गजानन गुरव, सागर डोंगरे, सतीश बांबरे, अमर पाटील, प्रशांत पांडव, परशुराम गुजरे, प्रशांत घोलप, संदीप माने, योगेश गोसावी, गौरव शिंदे तपासात सहभागी झाले होते.