पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष डॉ. एस. महेंद्र देव यांचे गुरुवारी व्याख्यान
schedule24 Nov 25 person by visibility 53 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष डॉ. एस. महेंद्र देव यांचे २७ नोव्हेंबर २०२५ रोजी कोल्हापुरात व्याख्यान आयोजित केले आहे. छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च (सायबर) या संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त दिवंगत प्रा. डॉ. ए. डी. शिंदे यांच्या स्मृती व्याख्यान अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सायबर येथील आनंदभवन येथे त्यादिवशी सकाळी ११ वाजता व्याख्यान होणार आहे. देव हे पहिल्यांदाच कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. ‘पर्यावरणपूरक सर्वसमावेशक प्रगती आणि आर्थिक दिशा’या अनुषंगाने ते मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती संस्थेचे संचालक डॉ. आर. के. टेलर यांनी पत्रकार परिषदेत दिली. संशोधक, धोरणकर्ते, विकास क्षेत्रातील तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांसाठी हे व्याख्यान लाभदायक ठरणार आहे. कारण डॉ. देव हे भारतातील आघाडीचे अर्थतज्ज्ञ आहेत. विकास, अर्थशास्त्र, कृषी धोरण, दारिद्रय निर्मूल्न, अन्नसुरक्षा आणि सर्वसमावेशक वाढ यामधील योगदान उल्लेखनीय आहे. त्यांचे समतोल विकासावरील मूलगामी संशोधन हे विविध क्षेत्रातील धोरणनिर्मितीला दिशादर्शक ठरले आहे. त्यांच्या व्याख्यानास मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सायबर संस्थेने केले आहे. पत्रकार परिषदेला प्राचार्य डॉ. टी. व्ही. जी.शर्मा, रजिस्ट्रर डॉ. विनायक साळोखे, डॉ. दीपक भोसले उपस्थित होते.