ते कावळा नाक्याच्या पुढे कधी आलेच नाहीत : शारंगधर देशमुखांचा राजेश लाटकरांना टोला
schedule06 Dec 25 person by visibility 23 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘विधानसभेत पराभूत झालेल्या आणि एक वर्षाने उगवलेल्या उमेदवाराने परवाच पत्रकार परिषद घेतली. यामध्ये किमान २० वेळा त्यांनी माझं कोल्हापूर असा उल्लेख केला.. पण ते उमेदवार प्रचार सोडून कधी कावळा नाक्याच्या पुढे आलेच नाहीत’, असा उपहासात्मक टोला शारंगधर देशमुख यांनी स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर यांचे नांव न घेता लगावला.
कोल्हापूर महानगरपलिका निवडणुकीच्या अनुषंगाने राजर्षी शाहू स्मारक भवन येथे शिवसेनेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. या मेळाव्यास शिवसैनिकांच्या गर्दीने शाहू स्मारक भवन परिसर व्यापून गेला. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार जयश्री जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शिवसेना जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा झाला. काही दिवसापूर्वी लाटकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आमदार क्षीरसागर यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला देशमुख व महानगरप्रमुख शिवाजी जाधव यांनी उत्तर दिले.
देशमुख यांनी, आमदार राजेश क्षीरसागर यांच्या माध्यमातून शहराचा विकास करण्याचे काम सुरु आहे. जिल्ह्यात सगळ्यात जास्त काम शिवसेनेने केले आहे. त्याचमुळे शिवसेनेला निवडणुकात एक नंबरची पसंती मिळत आहे. या चांगल्या वातावरणाचा फायदा करून घ्या. पुढील काळात शिवसेनेची पद्धतच महानगरपालिकेत राबेल. एकसंघपणे काम करून शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडणून आणूया. आतापर्यंत आम्ही केलेल्या पाहणीत १३ मतदारसंघातच ४० पेक्षा अधिक इच्छुक उमेदवार शिवसेनेकडे आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केल्या- केल्या निधीची पूर्तता होते. कोट्यावधी रुपयांचा निधी या शहराला मिळाला आहे. असे नमूद केले.
महानगरप्रमुख शिवाजी जाधव यांनी, थेट पाईपलाइनच्या पाण्याने अंघोळ करताना बादली नेमकी कोणी दिली..??? त्यांनीच आणली का तुम्ही दिली, अशी कोपरखळी मारली. त्यावर देशमुख यांनी, थेट पाईपलाईन मध्ये किती पाणी मुरलंय आणि पाण्याला कुठले कलर दिले गेलेत हेही वेळ आल्यावर जाहीर करू, असे उत्तर दिले.