कोल्हापुरात राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे काँग्रेसशी संधान, शिवसेनेची सातत्याने फसवणूक : सत्यजित कदमांचा हल्लाबोल
schedule06 Dec 25 person by visibility 42 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘विधानसभा असो की लोकसभेची निवडणूक कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून शिवसेनेला अपेक्षा इतकी मदत कधीच झाली. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची संधान असते.. आगामी निवडणुकीतही राष्ट्रवादीची अशीच भूमिका राहणार असेल तर ते महायुतीचा धर्म म्हणून योग्य नाही. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आताच भूमिका जाहीर करावी. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर कोणी अन्याय करत असेल तर खपवून घेतले जाणार नाही. शिवसेनेच्या विरोधात कोणीही डमी उमेदवार येता कामा नये.’असा हल्लाबोल शिवसेना जिल्हा समन्वयक सत्यजित कदम यांनी केला.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेचा मेळावा शनिवारी, दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे झाला. आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार जयश्री जाधव, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, शारंगधर देशमुख आदींच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा झाला. या मेळाव्यात कदम यांनी आक्रमक भाषण केले. कदम म्हणाले ‘प्रत्येक वेळी महापालिकेत शिवसेनेचे ४ - ५ नगरसेवक असे टोमणे मारले जात होते. पण आता परिस्थिती बदलली आहे. विधानसभेत आपण बाजी मारली. तीच उर्जा घेवून महानगरपालिकेवर भगवा फडकवायचा आहे. युती झाली तर प्रामाणिकपणे काम करुया. महायुती अंतर्गत राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून नेहमीच शिवसेनेची फसवणूक झाली आहे. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीची काँग्रेसशी संधान आहे. त्या संगनमातून शिवसेनेच्या उमेदवारांना पालिका निवडणुकीत रोखण्याचे प्रयत्न होतात.
हिंदुत्व जपण्याचे काम शिवसेनेन केले आहे. लाडक्या बहिणीही शिवसेनेच्या पाठीशी आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राज्यातील आणि आमदार राजेश क्षीरसागर यांचे जिल्ह्यातील काम लोकांपर्यत घेवून जावा. विधानसभेप्रमाणे याही निवडणुकीत कॉंग्रेस नेस्तनाभूत झाल्याशिवाय राहणार नाही. पुढच्या काळात अनेकजण बदनामीकारक वक्तव्यांसाठी पुढे येतील, पण त्यांच्या टीकाना भिक न घालता आपले व्हिजन मतदारांपर्यंत नेऊ या,’ असे आवाहन कदम यांनी केले.