महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नवीन वाशी नाका येथील राधिका ज्वेलर्स या दुकानातून चोरटयांन तीन लाख ८० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. छतातून दुकानातून प्रवेश करत दागिने लांबविले आहेत. गुरुवारी (९) रात्री नऊ ते शुक्रवारी (१० मे)सकाळी दहा या कालावधीत चोरीची घटना घडली. यासंबंधी जुना राजवाडा पोलिस स्टेशन येथे सराफ व्यावसायिक श्रीगणेश दाजी खताळ यांनी फिर्याद दिली आहे.
चोरटयांनी छतावरील पत्रा उचकटून आतील पीओफी फोडून दुकानात प्रवेश केला. पेढीच्या काऊंटरवरील ड्रॉव्हर उचकटून त्यातील सोन्याचे दागिने लंपास केले. यामध्ये ५० ग्रॅमचे सोन्याचे दागिने, २८ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, पाच ग्रॅमची अंगठी, आठ ग्रॅम वजनाचे दोन टॉप, पाच ग्रॅम वजनाच्या कानातील रिंग, बटन, टॉप्स चोरले आहेत. पोलिस उपअधीक्षक अजित टिके, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे, उपनिरीक्षक संतोष गळवे यांनी भेट दिली. दरम्यान सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले आहेत. चोरटे मध्यरात्री एक वाजून ३८ मिनिटांनी दुकानात आले. ते रात्री सव्वा तीन वाजेपर्यंत पेढीत असल्याचे कॅमेऱ्याद्वारे स्पष्ट झाले आहे.