प्रभागाने माझ्यावर प्रेम केलं…मुलांलाही पाठिंबा मिळतोय ! लोकसेवेची जाधव कुटुंबीयांची परंपरा !!
schedule11 Jan 26 person by visibility 57 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘लोकांची कामे करायची, अडअडचणी सोडवायच्या, सकंटात कोणी असेल तर त्याला मदतीचा हात द्यायचा ही जाधव कुटुंबीयांची परंपरा आहे. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव, शिवसेनेच्या उपनेत्या व माजी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव आणि माझ्यावर जननेते भरभरुन प्रेम दिलं. आता जाधव कुटुंबीयांची तिसरी पिढी समाजकारण, राजकारणात सक्रिय आहे. महापालिका निवडणूक लढवितेय. त्यांनाही जनतेचा पाठिंबा लाभतोय. महायुतीला अतिशय चांगले वातावरण आहे.’ अशी भावना माजी नगरसेवक संभाजी जाधव यांनी व्यक्त केली.
निमित्त होतं, महापालिका निवडणुकीतील प्रचाराचे. महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक तेरामधून त्यांचे चिरंजीव ओंकार जाधव हे उमेदवार आहेत. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढत आहेत. ओंकार जाधव हा तरुण चेहरा, राष्ट्रीय फुटबॉलपटू. गेली तीन चार वर्षे ते प्रभागात सक्रिय आहेत. जाधव कुटुंबीयांच्या सामाजिक, क्रीडा क्षेत्रातील परंपरा पुढे चालवित आहेत. मुलाच्या प्रचारार्थ माजी नगरसेवक संभाजी जाधव हे प्रभाग तेरा पिंजून काढत आहेत. रोज विविध भागातील लोकांच्या भेटीगाठी घेत आहेत. लोकांचा प्रतिसाद पाहून महायुतीच्या उमेदवारांच्या विजयाची खात्री वाटतेय असे त्यांनी सांगितले.
मुळात संभाजी जाधव म्हटलं की, फुटबॉलपटू, कार्यतत्पर नगरसेवक अशी प्रतिमा डोळयासमोर उभी राहते. शाहू मैदान, कैलासगडची स्वारी मंदिर, मंगेशकरनगर या प्रभागातून ते निवडून आले. तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर लोकप्रतिनिधी म्हणून प्रभागात विविध विकास योजना राबविल्या. नागरिकांच्या हाकेला ओ देणारा, मदतीला धावून जाणारा हा नगरसेवक अशी ओळख निर्माण झाली. त्यांच्या पाठोपाठ आता मुलगा ओंकार महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. तरुण आणि आश्वासक चेहरा म्हणून शिवसेनेने ओंकार जाधव यांना उमेदवारी दिली आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या सोबत ते प्रभाग पिंजून काढत आहेत. या प्रचाराच्या धामधुमीत माजी नगरसेवक संभाजी जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘जाधव कुटुंबीय आणि जनतेचे वेगळे ऋणानुबंध आहेत. प्रभागासाठी काम करायची आवड. त्यासाठी कष्टाची तयारी आहे. महत्वाचं म्हणजे, लोकांनी आमच्या कुटुंबांला खूप प्रेम दिलं आहे. तेच प्रेम, प्रचारात उत्स्फूर्त प्रतिसाद मुलांनाही मिळतोय.’