महायुतीचे उमेदवार हे कार्यसम्राट, महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
schedule11 Jan 26 person by visibility 48 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूर ही कुस्तीची पंढरी आहे. येथे अंगाला माती लावूनच आखाडयात उतरावे लागते. कोल्हापुरात कोणी शिक्षणसम्राट, कोणी साखरसम्राट आहेत. मात्र महायुतीचे सगळ उमेदवार हे कार्यसम्राट आहेत. महायुतीचे धुरंधर महापालिकेच्या मैदानात आहेत. विधानसभेला कोल्हापूरकांनी महायुतीला प्रचंड साथ दिली, आता महापालिका निवडणुकीतही तोच चमत्कार घडवून महायुतीचा भगवा फडकवू या.’असे आवाहन शिवसेना नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ छत्रपती शिवाजी चौक येथे सभा आयोजित केली होती. तत्पूर्वी महायुतीच्यावतीने कावळा नाका येथील छत्रपती ताराराणी चौकापासून रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी चौक येथे रॅली पोहोचताच उपमुख्यमंत्री शिंदे यांचे व्यासपीठावर आगमन झाले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार जयश्री जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय बलुगडे, शिवसेनेचे जिल्हा समन्यवक सत्यजीत कदम, माजी महापौर सुनील कदम यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उमेदवार व्यासपीठावर होते.
सभेला झालेली गर्दी पाहून उपमुख्यमंत्री म्हणाले, ‘महायुतीच्या सभेची गर्दी पाहून विरोधकांच्या पोटात भितीचा गोळा आला असेल. महायुतीची ही प्रचार सभा नव्हे तर विजयी सभा आहे. विरोधकांना चारीमुंडया चीत करुन महायुती महापालिकेवर भगवा फडकवेल. ज्या उमेदवारांच्या मागे लाडक्या बहिणी, त्या उमेदवारांचा मतपेटीत पहिला नंबर. लाडक्या बहिणींनी विधानसभेला चमत्कार घडविला, आता महापालिकेतही महायुतीला साथ द्या. कोल्हापूर महापालिकेतील काँग्रेसचा पंधरा वर्षाचा कारभार हा भ्रष्ट आहे. आता यामध्ये बदल घडवायचा आहे. त्यासाठी महायुतीशिवाय पर्याय नाही. शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महायुतीला भक्कम साथ देत बदल घडवू या.’ भाषणात उपमुख्यमंत्री शिंदे यांनी कोल्हापुरातील विकासकामासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली. रिंगरोड, चित्रनगरी, आयटीहबसह क्रीडा क्षेत्रालाही निधी कमी पडू देणार नाही. महापालिकेची नवी प्रशासकीय इमारत ही होईल असे त्यांनी सांगितले. याप्रसंगी उमेदवार ऋतुराज क्षीरसागर, शारंगधर देशमुख, सत्यजित जाधव, ओंकार जाधव, वैभव माने, स्वरूप कदम, संगीता रमेश पोवार, प्रकाश नाईकनवरे, अजित मोरे आदी उपस्थित होते