सेट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली ! कोल्हापुरात ९२८२ विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा !!
schedule27 Mar 23 person by visibility 465 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : सहायक प्राध्यापकासाठीची महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) परीक्षा कोल्हापुरातील २३ केंद्रावर सुरळीत पार पडली. कोल्हापूर विभागात या परीक्षेसाठी एकूण १०,५८२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९२८२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर १३०० विद्यार्थी गैरहजर राहिले. कोरोानामुळे गेल्यावर्षी परीक्षा झाली नाही. यामुळे यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा टक्का वाढला. जवळपास पंधर टक्क्यांनी परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या वाढली. दरम्यान शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागातील प्रा. डॉ. प्रशांत अनभुले यांनी या परीक्षेसाठी समन्वयक म्हणून काम पाहिले.
कोल्हापूर शहरातील विविध शाळा, महाविद्यालये ही परीक्षा केंद्र म्हणून निश्चित केली होती. शिवाजी विद्यापीठासह न्यू कॉलेज, महावीर कॉलेज,विवेकानंद कॉलेज, एस. एम.लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, महाराष्ट्र हायस्कूल, गर्ल्स हायस्कूल या ठिकाणी परीक्षा झाली. सकाळी दहा ते अकरा या वेळेत सामान्यज्ञान, बुद्धिमत्ता यावर आधारित पेपर होता.तर सकाळी ११.३० ते दुपारी १.३० या वेळेत २०० गुणांचा पेपर झाला. मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र या विषयांचा हा पेपर होता.
या परीक्षेचे कोल्हापूर विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. प्रशांत अनभुले म्हणाले, ‘ सेट परीक्षेसाठी कोल्हापुरातील २३ ठिकाणे ही परीक्षा केंद्र म्हणून निश्चित होती. दोन सत्रात ही परीक्षा अतिशय सुरळीतपणे पार पडली. ”