अखंडपणे तेवत राहणारे ज्ञानदीप
schedule22 Oct 25 person by visibility 77 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, अध्यात्मिक अशा विविध क्षेत्रात उत्तुंग कार्य करत , स्वकर्तृत्वावर स्वत:ची वेगळी दुनिया निर्माण करणारं व्यक्तिमत्व म्हणजे पद्मश्री, माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील. त्यांचा २२ ऑक्टोबर रोजी वाढदिवस. २२ ऑक्टोबर २०२५ रोजी डॉ .डी. वाय. पाटील हे ९१ व्या वर्षानिमित्त पदार्पण करत आहेत. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षात होत आहे. समाजातील वेगवेगळया घटकांनी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. दादा या नावांनी ते सर्वपरिचित. अखंडपणे तेवत राहणारे ज्ञानदीप अशा शब्दांत त्यांच्याविषयी अनेकांनी भावना व्यक्त केल्या. वाढदिवसाच्या निमित्ताने डॉ. डी. वाय. पाटील यांचे चिरंजीव डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील व आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलेल्या सदिच्छा.
डी वाय पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील म्हणतात, ‘ दादा आणि आईंच्या आशिर्वादाने विविध संस्था उभारल्या. वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात काम सुरू आहे. संस्थेच्या विविध महाविद्यालयातून मेडिकल, इंजिनीअरिंग, फार्मसी, कृषी अशा विविध अभ्यासक्रमातून आतापर्यंत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या सव्वा पाच लाखांहून अधिक आहे. त्यांनी, कष्ट आणि संघर्षातून आयुष्यात यश मिळवले. अनेक संस्था उभारल्या. ते अनेकांचे आधारवड ठरले. जे काम करायचं ते अगदी मनापासून त्यांची शिकवण आम्ही अंगिकारलीय. कष्ट, संघर्षाला सामोरे जाण्याची तयारी, जिद्द, सकारात्मक भावना, नम्रता हे गुण त्यांनी आमच्यात रुजविले. त्यांच्यातील व्यवस्थापन कौशल्याचा गुणही आमच्याकडे आला आहे. १९८४ मध्ये कसबा बावडा येथे अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले. गेल्या चार दशकाच्या कालावधीत डी वाय पाटील ग्रुपने देशभरात शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण केले. डी वाय पाटील ग्रुपच्या आज शाळा व महाविद्यालयांची संख्या १८२ पर्यंत पोहोचली आहे. संस्थेत एक लाख ४० हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. २२ हजार शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांनी स्थापन केलेल्या संस्था, त्यांच्या कार्याचा आम्हाला प्रचंड अभिमान आहे. त्यांनी आमच्यावर जी जबाबदारी सोपविली आहे त्या अधिकाधिक चांगल्या पद्धतीने पार पाडण्याला आम्ही सर्वोच्च प्राधान्यक्रम दिले. आजच्या वाढदिनी परमेश्वराकडे एकच प्रार्थना आहे, त्यांच्या आशीर्वादाचे हात सदैव आमच्यावर राहोत !’
काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते व आमदार सतेज पाटील यांनी सदिच्छा व्यकत करताना म्हटले आहे, ‘अडचणींवर मात करण्याची आणि पुढे जाण्याची आपली वृत्ती नेहमीच आमच्यासाठी प्रेरणेचा स्रोत राहिली आहे. राजकीय आणि सामाजिक जीवनात, समाजकल्याणावर लक्ष केंद्रीत करणे, लोकांशी घनिष्ठ संबंध ठेवणे आणि प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक प्रतिसाद देणे हेच आम्हाला लोकांच्या मनात अद्वितीय स्थान मिळवून देते. आपल्या लोकांशी जोडण्याची कला, कोणत्याही कामावर सातत्याने लक्ष केंद्रित करणे, धाडसी निर्णय घेण्याची वृत्ती आजही आदर्श आहे. नव्वदीतील उत्साह आणि ऊर्जा आम्हाला सतत प्रेरणा देते. दादा, तुम्हाला ९० व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! आई अंबाबाई तुम्हाला चांगले आरोग्य देईल, हीच एक प्रार्थना आहे..!