रांगडे कोल्हापूर…हटके स्पर्धा ! दुचाकी चालवित नेतेमंडळींनी वाढविला उत्साह!!
schedule22 Oct 25 person by visibility 179 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूरची अशी काही वेगळी वैशिष्ट्ये आहेत. बदलत्या काळातही कोल्हापूरकरांनी अशी वेगळी वैशिष्ट्ये जपली आहेत. बैलपोळयाला सर्वत्र बैलजोडीची पूजा होते. बैलांची मिरवणूक काढली जाते. कोल्हापूर आणि परिसर बेंदूर धुमधडाक्यात साजरा होतो. त्याचप्रमाणे कोल्हापुरात दिवाळी पाडव्याला म्हशींची सजावट, सौंदर्य स्पर्धा आणि म्हशींच्या स्पर्धा अतिशय उत्साहात होतात. पशुपालकांमध्ये म्हशींची सजावट करण्यासाठी चढाओढ पाहावयास मिळते. तसेच दुचाकीसोबत म्हशींच्या धावण्याच्या स्पर्धा हा तर वेगळा थरार असतो. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही या स्पर्धा मोठया जल्लोषात पार पडल्या. कोल्हापुरातील हा रांगडा खेळ अन् हटके स्पर्धा नेतेमंडळींनी सहभाग नोंदवित मोटारसायकली चालविल्या, पशुपालकांचा उत्साह वाढविला.
कोल्हापुरातील विविध भागात दिवाळी पाडव्याला अगदी सकाळपासूनच या अनोख्या स्पर्धेचा माहौल पाहावयास मिळत होतो. पशुपालक आपल्या लाडक्या पशुधनासोबत म्हशींची सजावट केली होती. म्हशींची शिंगे रंगविली होती.अनेक भागात वाजतगाजत मिरवणूक काढली. आणि साऱ्यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे, दुचाकीसोबत म्हशींची धावण्याची स्पर्धा. सायलेनसर काढलेल्या दुचाकींचा मोठा आवाज, पशुपालकांची आरोळी आणि उपस्थितांचा जल्लोष असे चित्र ठिकठिकाणी पाहावयास मिळते. कोल्हापूर शहर आणि आसपाच्या भागात बुधवारी (२२ ऑक्टोबर २०२५) दुचाकीसोबत म्हशी पळवण्याच्या स्पर्धा झाल्या. शिवाजी पेठ, बुधवार पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठ, दुधाळी, कसबा बावडा, कदमवाडी, भोसलेवाडी, पाचगाव, कळंबा, फुलेवाडी अशा विविध ठिकाणी आयोजित ही स्पर्धा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते व आमदार सतेज पाटील यांनी कसबा बावडयातील भारतवीर मित्र मंडळ आणि शर्यत शौकिन तरुण मंडळाकडून आयोजित म्हैस सजावट आणि रोड शोला भेट दिली. तरुणाईसोबत दुचाकी चालविण्याचा आनंद लुटला.कोल्हापुरात गवळी समाजातर्फे दुचाकीसोबत म्हशी पळविण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्पर्धा स्थळी भेट दिली. गवळी बांधवाचा उत्साह वाढविला. दुचाकी चालवित कार्यकर्त्याचा उत्साह वाढविला. फुलेवाडीतही स्पर्धा रंगली. स्थायी समितीचे माजी सभापती शारंगधर देशमुख, मानसिंग पाटील, विवेक महाडिक, विजय देसाई, संजय सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही स्पर्धा झाली.यामध्ये परिसरातील शेतकरी, पशुपालक मोठया संख्येने सहभागी झाले होते.