काँग्रेसचा जाहीरनामा फसवा, सतेज पाटलांच्याकडून सूर्य - चंद्र सोडून सगळी आश्वासने - धनंजय महाडिकांची बोचरी टीका
schedule07 Jan 26 person by visibility 126 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी सूर्य आणि चंद्र सोडून सर्वच आश्वासन या जाहीरनाम्यातून कोल्हापूरकरांना दिले आहेत. गेली पंधरा वर्षे महापालिका त्यांच्या ताब्यात होती. मग त्यावेळी हे सगळे का केले नाही ? हातातून सत्ता निघून गेलेली आहे हे लक्षात आल्याने अनेक गोष्टींचा आश्वासने त्यांनी दिली आहेत.’ असा टोला भारतीय जनता पक्षाचे खासदार धनंजय महाडिक यांनी लगावला. ‘भ्रष्टाचारमुक्त कारभार करण्याची सांगायची वेळ त्यांच्यावर आली, यातूनच सर्वांना कळते की भ्रष्टाचारमध्येच त्यांचे हात रंगले आहेत. थेट पाईपलाईनमध्ये मोठा ढपला त्यांनी पाडला. टोलची पावती फाडली. भ्रष्टाचारमुक्त कारभार हे त्यांच्याकडून ऐकणं म्हणजे हास्यास्पद आहे .’अशी बोचरी टीका महाडिकांनी केली.
महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी, सात जानेवारी रोजी जाहीरनामा प्रसिद्ध केला. काँग्रेसच्या या जाहीरनाम्यासंबंधी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी खासदार महाडिक यांच्याकडे विचारणा केली. त्यावर महाडिक म्हणाले, ‘काँग्रेस पक्षाने जाहीर केलेला हा जाहीरनामा हास्यास्पद आहे. अशी आश्वासने देण्याची सवय आमदार पाटील यांना आहे.महापालिकेत सत्ता असताना त्यांनी या गोष्टी का केल्या नाहीत ? निवडणुकीच्या तोंडावर हे का सुचते ? मात्र लोक जागरूक आहेत. पंधरा वर्षात त्यांनी जे दिलं नाही, ते आता देतो म्हणत आहेत. जाहीरनाम्यातील सर्व बाबी पूर्ण करण्यासाठी निधीची आवश्यकता असते. राज्यात आणि केंद्रात काँग्रेसचे सरकार नाही, जिल्ह्यातील एक ही आमदार विधानसभेमध्ये नाही. मग निधी येणार कुठून? हे कोल्हापुरातले सुज्ञ नागरिक जाणतात.’
कोल्हापूर महापालिका निवडणुकीसंबंधी महायुतीचा जाहीरनामा दोन दिवसात लोकांसमोर येईल. आम्ही जे देऊ शकतो, ते जाहीरनाम्यात आहे. कारण केंद्रात आणि राज्यात सरकार महायुतीचे आहे. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री जिल्ह्यातील दहा आमदार हे महायुतीचे आहेत. आयडियल आणि स्मार्ट कोल्हापूर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा जाहीरनामा असेल. मात्र काँग्रेसचा फसवा जाहीरनामा लोक स्वीकारणार नाहीत याची मला खात्री आहे. थेट पाइपलाइन योजनेच्या सादरीकरणप्रसंगी आमदार पाटील यांनी ज्या कावळा नाका टाकीचा फोटो दाखवला, ती पाण्याची टाकी दहा वर्ष बंद आहेत. शिवाय बास्केट ब्रिजबाबत सतेज पाटील यांची बालबुद्धी दिसून येते अशी चपराकही त्यांनी लगावली.
काँग्रेसने जाहीर केलेल्या मोफत केएमटी प्रवास योजनेवर बोलताना महाडिक म्हणाले, ‘कोल्हापुरातील ७० केएमटी बसेस नादुरुस्त आहेत. त्या बसचे ते टायर बदलू शकलेले नाहीत, त्यामुळे काँग्रेसचे नेते कुठून पिंक बस आणणार ? केंद्र सरकारच्या माध्यमातून शंभर इलेक्ट्रिक बस कोल्हापुरात येत आहेत. त्याच्या चार्जिंग स्टेशनचे काम सुरू आहे. दीड महिन्यात ते पूर्णत्वास येईल.’