आमचा अजेंडा एकच, कोल्हापूरचा विकास अन् तो शाश्वत विकास – राहुल चिकोडे
schedule07 Jan 26 person by visibility 86 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :‘ निवडणुकीच्या कालावधीत भूलथापा मारायच्या काम विरोधक मंडळी करत आहेत. मात्र कोल्हापुरातील जनता सूज्ञ आहे. ते महायुतीच्या पाठीशी राहतील. कोल्हापूरच्या जनतेचे हित महायुतीच करु शकतो, हे नागरिकांना पक्के ठाऊक आहे. आमचा अजेंडा एकच, तो म्हणजे कोल्हापूरचा विकास एकच आणि तो शाश्वत विकास.’असे मत प्रभाग क्रमांक १९ मधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राहुल चिकोडे यांनी व्यक्त केले.
चिकोडे हे गेली तीस वर्षे समाजकारण व राजकारणात आहेत. भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते म्हणून संघटनात्मक पातळीवर कार्यरत आहेत.सामाजिक उपक्रमांत आघाडीवर असतात. त्यांनी साहित्यिक, शैक्षणिक उपक्रम राबविले आहत. भालचंद्र चिकोडे ग्रंथालय, स्पेस इनोव्हेशन सेंटर, हॉल बांधणी, वॉकिंग ट्रॅक अशी विविध कामे केली आहेत.
भाजपने त्यांना महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १९ मधील उमेदवारी दिली आहे.महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ ते प्रभागात घर टू घर संपर्क साधत आहेत. मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत. उमेदवारीबद्दल भूमिका मांडत आहेत. प्रभाग क्रमांक १९ अमध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातून राहुल चिकोडे उमेदवार आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला गटातून राष्ट्रवादीकडून मानसी लोळगे, सर्वसाधारण महिला गटातून रेणू माने तर सर्वसाधारण गटातून विजयसिंह खाडे हे उमेदवार आहेत.
चिकोडे म्हणाले, ‘ विरोधकांसारखं खोटं बोल, पण रेटून बोल हे आपणाला जमत नाही. कोल्हापूर महापालिकेची सत्ता अनेक वर्षे काँग्रेसकडे होती. काँग्रेसने कोल्हापूरची काय अवस्था केली आहे ते लोकांनी पाहिलंय. महायुतीकडे एकदा सत्ता द्यावी. येत्या पाच वर्षात जनतेच्या मनातील जे कोल्हापूर आहे, ते साकार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. महायुतीमध्ये तीन पक्ष आहेत. अतिशय उत्तमरित्या काम सुरू आहे. महापालिका निवडणूक कोल्हापूर शहराचा चेहरामोहरा बदलणारी आहे. महायुतीचे उमेदवार हे सर्वसामान्य घरातील आहेत. महायुतीच्या कामकाजाची पद्धत आहे, विकासाची आणि सकारात्मक आहे. कोल्हापूर महापालिकेतही त्याच धर्तीवर विकासाचे काम केले जाईल. केंद्रात महायुती, राज्यात महायुती आता महापालिकेतील महायुती हवी. ’