सांगलीत चाचा नेहरु बाल महोत्सवास दिमाखात प्रारंभ
schedule07 Jan 26 person by visibility 37 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोणत्याही स्पर्धेत यश मिळणे किंवा न मिळणे ही गौण गोष्ट आहे, परंतु त्यामध्ये उत्साहाने सहभागी होणे सर्वात महत्त्वाचे असते. चाचा नेहरू बाल महोत्सवात सर्व विद्यार्थ्यांनी आपला सर्वोत्तम कामगिरी करावी आणि इतरांसमोर आदर्श ठेवावा, जेणेकरून इतर मुलेही त्यातून प्रेरणा घेऊ शकतील. या बाल महोत्सवामुळे मुला-मुलींच्या व्यक्तिमत्त्व विकासास चालना मिळेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी केले. चाचा नेहरू बाल महोत्सव सात ते नऊ जानेवारी २०२६ असा तीन दिवस चालणार आहे.
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, सांगली यांचेमार्फत शासकीय / स्वयंसेवी संस्था व शाळांमधील बालकांसाठी कै. दादू काका भिडे व सौ. सुंदरबाई मालू मुलींचे बालगृह निरीक्षण गृह सांगली येथे आयोजित जिल्हास्तरीय चाचा नेहरु बाल महोत्सव २०२५-२६ चे उद्घाटन जिल्हाधिकारी काकडे यांच्या हस्ते झाले. बाल न्याय मंडळाच्या अध्यक्ष प्रमुख न्यायदंडाधिकारी प्रियांका करवंदे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी वर्षा पाटील, जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर, जिल्हा परिवीक्षा अधिकारी सुरेंद्र बेंद्रे, जिल्हा संरक्षण अधिकारी संजय चौगुले, अधिक्षक अमर भोसले, बाल कल्याण समिती अध्यक्ष निवेदिता ढाकणे, बाल न्याय मंडळाच्या सदस्य डॉ. जयश्री पाटील, डॉ. उदय जगदाळे, तुशाल शिवशरण आदि उपस्थित होते. दीप प्रज्वलन व आकाशात फुगे सोडून या बाल महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
तीन दिवस चालणाऱ्या या बाल महोत्सवात क्रीडांगणावरील सांघिक खेळ कबड्डी, खो-खो, क्रिकेट, रिले, बौध्दिक खेळ कॅरम, बुध्दिबळ, चित्रकला, निबंध, वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम सामूहिक गायन, सामूहिक नृत्य अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.