कोल्हापुरात बहरणार ५४ वे पुष्प प्रदर्शन ! महावीर उद्यान येथे विविध कार्यक्रम !!
schedule05 Dec 24 person by visibility 273 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : “गार्डन्स क्लब आणि कोल्हापूर महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने "आपली माती, आपले भवितव्य" या संकल्पनेवर आधारित ५४ वे पुष्प प्रदर्शन सहा ते आठ डिसेंबर २०२४ या कालावधीत महावीर उद्यान येथे होत आहे. यानिमित्ता पुष्प रचना, सजावट तसेच प्रात्यक्षिके यांचा सुंदर मिलाफ कोल्हापूरकरांना अनुभवायला मिळेल” असे गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी सांगितले.
या प्रदर्शनाची सुरुवात शुक्रवारी, ६ डिसेंबर रोजी संध्याकाळी चार वाजता शोभायात्रेने होईल. तत्पूर्वी दुपारी बारा वाजल्यापासून स्पॉट गार्डन कॉम्पीटिशनला सुरुवात होईल. संध्याकाळी ५ वाजल्यापासूम टेराकोटा जर्नी (गौरव काईंगडे) संस्थेतर्फे मातीपासून विविध प्राणी बनवण्याचे प्रात्यक्षिक होईल. पक्षी अभ्यासक धनंजय जाधव यांचे 'प्राणी शहराकडे का वळतात?' या विषय[ व्याख्यान होईल.
शनिवारी, सात डिसेंबर रोजी सकाळी पुष्प स्पर्धा होईल, ज्यात स्पर्धक आपल्याकडील फुललेले गुलाब, झेंडू, निशीगंध, जर्बेरा अशा अनेक प्रकारच्या फुलांच्या जाती प्रदर्शनात मांडतील. दुपारच्या सत्रात गार्डन्स क्लबतर्फे सुरु असणाऱ्या उद्यानविद्या व नर्सरी मॅनेजमेंट या कोर्सच्या आजी व माजी विद्यार्थ्यांचा मेळावा होईल.
संध्याकाळच्या सत्रात चार वाजल्यापासून 'आपली माती आपले भवितव्य' या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारीत स्कीट कॉम्पीटिशन घेण्यात येतील. यानंतर सळसळत्या तरुणाईच्या, कल्पनांचा आविष्कार दाखवणारा 'बोटॅनिकल फॅशन शो' ला प्रारंभ होईल. रविवारी ८ डिसेंबरला सकाळी चित्रकला स्पर्धा आयोजित केली आहे. चित्रकला स्पर्धेनंतर 'हसत खेळत पर्यावरण ' अंतर्गत भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ.अनिलराज जगदाळे हे मुलांचे पर्यावरणावर आधारित खेळ घेणार आहेत.
या नंतर दुपारी ११ ते १२.३० या वेळेत चिनार भिंगार्डे यांची 'कॉयर क्राफ्ट' या विषयावर, नारळाच्या तंतूपासून शोभेच्या वस्तू बनवण्याची कार्यशाळा संपन्न होईल. ही आगळी वेगळी कला शिकण्यासाठी कोल्हापूरकरांनी जरूर नावनोंदणी करावी. संध्याकाळी शॉर्ट फिल्म स्पर्धेतील विजेते लघुपट दाखविण्यात येतील.यानंतर वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आहे.
पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष अविनाश शिरगावकर, सचिव सुप्रिया भस्मे, खजानिस प्राजक्ता चरणे, सुनिता पाटील, शशिकांत कदम, रुपेश हिरेमठ, अंजली साळवी, शांतादेवी पाटील, चित्रा देशपांडे, गौरव काइंगडे, सुमेधा मानवी रघुनंदन चौधरी, कल्पना सावंत, संस्थापक सदस्य रवींद्र ओबेराय अरुण नरके उपस्थित होते.