गुणीदास फाऊंडेशने घडविली ‘तीर्थ विठ्ठल’मधून अभंग -भक्तीसंगीताची वारी
schedule26 Jul 26 person by visibility 14 category
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आषाढी एकादशीनिमित्त भक्ती संगीत व अभंगांचा विशेष कार्यक्रम शनिवारी, कोल्हापुरात झाला. गुणीदास फाऊंडेशनतर्फे आयोजित या कार्यक्रमातून उपस्थितांची पंढरीची सुरेल वारी घडली. गायन समाज देवल क्लब येथील गोविंदराव टेंबे रंगमंदिर येथे हा कार्यक्रम झाला. स्वर्गीय उद्योजक बापूसाहेब जाधव यांना हा कार्यक्रम समर्पित करण्यात आला होता. त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी दीपक जाधव, फाऊंडेशनच्या अध्यक्षा सुस्मिता सप्रे, उपाध्यक्ष दिलीप बनछोडे उपस्थित होते.
गायिका अंजली मराठे, गायक जयदीप वैद्य यांनी भक्तीगीते व अभंग सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. ‘विठ्ठल विठ्ठल’आणि ‘जय जय राम कृष्ण हरी’च्या गजरात कार्यक्रमाची सुरुवात झाली. गायिका मराठे व गायक वैद्य यांनी, कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई यांचे अभंग सादर केले. टाळ मृदुगांचा ताल, तबल्याचा गजर यामुळे वातावरण भक्तीमय बनले. त्यांनी, संतांच्या ‘माझी माय माऊली, सुखाचे जे सुख, मोगरा फुलला, सुंदर ते ध्यान, तीर्थ विठ्ठल’ अभंग, रचना सादर केल्या. या कार्यक्रमासाठी स्नेहल दामले यांनी निरुपण केले. राजप्रसाद धर्माधिकारी, आशय कुलकर्णी यांनी तबला, हरी जोशी यांनी टाळ, पार्थ भूमकर यांनी पखवाज, डॉ. सचिन जगताप यांनी बासरी, केदार गुळवणी यांनी व्हायोलिन तर स्वरुप दिवाण यांनी हार्मोनियम साथ केली.