सोहळा भक्तीचा…भाव सेवेचा !
schedule25 Jul 26 person by visibility 8 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आषाढी वारी आणि दिंडी यावर साऱ्यांची श्रद्धा. पंढरीच्या विठुरायाचा गजर करत कोल्हापुरातही लाखो भाविक प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या नंदवाळ येथे दर्शनासाठी गेले. आषाढी एकादशीनिमित्त आयोजित या दिंडी सोहळयात भाविकांच्या सोयीसुविधा व सेवेसाठी शनिवारी, २५ जुलै रोजी सकाळपासूनच कोल्हापूरकरांचे हजारो हात राबले. कोण खिचडी वाटप करत होते. तर कोण पाण्याच्या बाटल्या पुरवित होते. कोण चहा तर कुणी राजगिरा लाडू वाटप…विविध संस्था, संघटना आणि व्यक्तीगत पातळीवरही सर्वत्र सेवाभाव. दिंडी मार्गावरील स्वच्छतेसाठी असंख्य मंडळी राबत होती. या भक्तीमय सोहळयात सेवेचा भाव पदोपदी जाणवत होता.
आमदार, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, तालीम मंडळाचे कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्थाचे प्रतिनिधी, कॉलेजची विद्यार्थी अशा विविध घटकांनी सेवाकार्यात हातभार लावला. गोकुळ दूध संघातर्फे पुईखडी येथे भाविकासाठी सुग्ंधी दूध वाटप करण्यात आले. आमदार चंद्रदीप नरके हे रिंगण सोहळयात सामील झाले. आमदार राजेश क्षीरसागर हे पायी दिंडीत सहभागी होत भाविकांच्या सोयी सुविधावरही फोकस केले. शिवसेनेतर्फे जुना वाशी नाका येथे कक्ष उभारला होता. शिवसेनेचे गटनेते शारंगधर देशमुख यांचाही सेवाकार्यात पुढाकार राहिला. शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजीत कदम यांनी फाऊंडेशनतर्फे भाविकासाठी नवीन रंकाळा उद्यानसमोर प्रसाद वाटप केले.
भारतीय जनता पक्षातर्फे क्रशर चौक येथे भाविकांना खिचडी वाटप करण्यात आले. महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते येथे उपस्थित होते. तंदूर कॉर्नर हॉटेलतर्फेही भाविकासाठी खिचडीची सोय केली होती. रामेश्वर पतकी व सहकारीही भाविकांच्या सुविधासाठी सक्रिय होते. माजी नगरसेवक राजू दिंडोर्ले यांच्या पुढाकारातून स्वरराज चॅरिटेबल ट्रस्टतर्फे भाविकासाठी खिचडी, चहा वाटप केले. माऊली ग्रुप, शिवसंशो मित्र मंडळ, डावरे ग्रुप, शिवशक्ती मित्र मंडळ, जिव्हेश्वर फाऊंडेशन, देसाई कॅटरर्स, सरनाईक परिवार यांच्यासह विविध घटकांनी भाविकांना सेवासुविधा पुरविल्या. दि कोल्हापूर अर्बन को ऑपरेटिव्ह बॅँक, सानेगुरुजी शाखेतर्फे भाविकांना फराळ वाटप केले. तुळशीची रोपे दिली. बँकेचे उपाध्यक्ष जयसिंग माने व अन्य संचालकांच्या उपस्थितीमध्ये आरती झाली. केआर मोटर्स, सुझुकी मोहिते यांच्यातर्फे ही भाविकांना फराळ वाटप केले. विविध कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी स्वयंसेवकाची जबाबदारी पार पाडली. शिवसेना वैद्यकीय शाखेतर्फे खिचडी वाटप केले. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार जयश्री जाधव, परिवहन समिती सभापती सत्यजीत जाधव यांच्या हस्ते व नगरसेवक आश्किन आजरेकर, माजी नगरसेवक विनायक साळोखे, प्रशांत साळुंखे, विश्वास साळोखे यांच्या उपस्थितीमध्ये खिचडी वाटपाचा कार्यक्रम झाला. कोल्हापूर शहर आणि दक्षिण विधानसभा काँग्रेसच्यावतीने दिंडी मार्गावर भाविकांना फराळ वाटप करण्यात आले. आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार ऋतुराज पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, गटनेते इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक राहुल माने, सुषमा जरग, माजी नगरसेवक मधुकर रामाणे आदी उपस्थित होते.
………………….
‘आम्ही चित्रकर्मी’ची स्वच्छतेची वारी
चित्रपट व्यवसायाशी निगडीत तंत्रज्ञ, पडद्यामागील कलाकार, कलादिग्दर्शक, निर्मिती व्यवस्थापक अशा विविध घटकांनी, ‘आम्ही चित्रकर्मी’ हा ग्रुप स्थापन केला आहे. या ग्रुपतर्फे मिरजकर तिकटी ते पुईखडीपर्यंत स्वच्छता मोहिम राबविली. दिंडी मार्गावरील प्लास्टिक बाटल्या, पिशव्या, कागद, कचरा गोळा केला. रणजीत जाधव, मिलिंद अष्टेकर, अमर मोरे, मकरंद लिंगनूरकर यांच्यासह जवळपास चाळीस जणांचा यामध्ये सहभाग होता.